MumbaiNewsUpdate : माजी व्यवस्थापकाने केला गेम , शाखा व्यवस्थापक महिला अधिकाऱ्याचा मृत्यू

मुंबई : विरारमधील आयसीआयसीआय बँकेवर माजी व्यवस्थापकानेच काही लोकांच्या साहाय्याने दरोडा पडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत रात्री ८ वाजेच्या सुमारास काही जणांनी सशस्त्र हल्ला करीत बँक लुटण्याचा प्रयत्न केला. विरारमधील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेवर हा दरोडा टाकण्यात आला. या हल्ल्यात शाखा व्यवस्थापक महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, तर कॅशियर महिला जखमी झाली आहे. दरम्यान आरोपी माजी व्यवस्थापक दुबे याला सोने आणि पैशाची बॅग घेऊन फरार होत असताना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले.
या विषयीची अधिक माहिती अशी कि , विरार पूर्वेच्या मनवेल पाडा येथे आयसीआयसीआय बँकेची शाखा आहे. गुरुवारी (२९ जुलै) संध्याकाळी बँक बंद झाल्यावर सर्व कर्मचारी निघून गेले होते. त्यावेळी बँकेत रोखपाल श्वेता देवरूख (वय ३२) आणि व्यवस्थापक योगिता वर्तक (वय ३४) या दोघीच होत्या. दरम्यान रात्री ८ वाजेच्या सुमारास बँकेचा माजी व्यवस्थापक अनिल दुबे बँकेत आला. त्याने चाकूचा धाक दाखवत बँकेतील रोख रक्कम आणि दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोघींनी विरोध केला. दुबे याने दोघींवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात व्यवस्थापक योगिता वर्तक यांचा जागीच मृत्यू झाला, तर रोखपाल श्वेता गंभीर जखमी झाल्या. विरार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन, दोन्ही जखमी महिला कर्मचाऱ्यांना रुग्णालयात हलविले होते, मात्र यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.