IndiaNewsUpdate : प्रकृती बिघडल्याने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन एम्समध्ये दाखल

नवी दिल्ली : तिहारच्या तुरुंगात बंदिस्त असलेला अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजनची प्रकृती अचानक बिघडल्याचे वृत्त असून त्याला आज गुरुवारी उपचारार्थ नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थात (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले आहे. पोटदुखीच्या त्रासामुळे तुरुंग प्रशासनाने राजनला तत्काळ रुग्णालयात भरती केले . या पूर्वी एप्रिल महिन्यातही कोविडच्या संसर्गामुळे त्याला एम्समध्ये दाखल केले होते.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार तिहारच्या तुरुंग क्रमांक २ मध्ये असताना मंगळवारी दुपारपासून छोटा राजनला पोटदुखीचा त्रास होत होता. सुरक्षा सैनिकांनी हि माहिती जेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर तुरुंग प्रशासनाने डॉक्टरांशी संर्पक साधल्यानंतर त्यांच्या सल्ल्यानुसार राजनला पुन्हा एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे . यावेळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सध्या ६१ वर्षीय छोटा राजन विविध प्रकरणात तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे . २०१५ मध्ये इंडोनेशियाच्या बाली मधून राजनला अटक करून आणले होते. तेंव्हापासून छोटा राजन तिहार तुरुंगात आहे.
छोटा राजांवर हत्या, जबरीने खंडणी वसूल करणे अशा स्वरूपाचे तब्ब्ल ७० गुन्हे दाखल आहेत. २०११ मध्ये पत्रकार ज्योतिर्मय उर्फ जे डे हत्या प्रकरणात २०१८ मध्ये छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय मुंबईतील इतर सर्व गुन्हे सीबीआयकडे वर्ग करण्यात आले असून त्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात अली आहे.