IndiaNewsUpdate : न्यायाधीशांचा ऑटोच्या धडकेने मृत्यू , सीसीटीव्ही मध्ये उघड झाले धक्कादायक सत्य !!

धनबाद : झारखंडच्या धनबादमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका जिल्हा न्यायाधीशाचा मृत्यू अपघाताने नव्हे तर घातपाताने झाल्याची घटना सीसीटीव्ही फुटेज मधून उघडकीस आली असून या प्रकरणात ऑटोचालकासह आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयातील बार असोसिएशनने केली आहे.
झारखंड जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश उत्तम आनंद बुधवारी सकाळी ५.०० वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉक करीत असताना याच दरम्यान मागून आलेल्या एका ऑटोने त्यांना धडक दिल्यामुले ते गंभीर जखमी झाले. बराच वेळ कुठलीही मदत न मिळाल्याने आनंद रस्त्यातच पडले होते. त्यानंतर एका व्यक्तीने त्यांना शहीद निर्मल महतो रुग्णालयात दाखल केले परंतु, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
दरम्यान उत्तम आनंद यांच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी जेंव्हा या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेंव्हा ऑटो चालकाने त्यांना जाणीवपूर्वक धडक दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी आरोपी ऑटो चालकाला अटक केली. मात्र, हा ऑटो चोरीचा असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. ऑटो चोरी झाल्यानंतर तीन तासांनी ही घटना घडली. धडकेनंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता.
न्या. आनंद हे हजारीबागचे रहिवासी होते. उल्लेखनीय म्हणजे, शहरातील कुप्रसिद्ध गँगस्टर अमन सिंह याच्यासहीत १५ हून अधिक माफियांच्या प्रकरणावर ते सुनावणी करत होते. नुकताच त्यांनी या गँगस्टर आणि माफियांना जामीन नाकारला होता. आनंद यांच्या पत्नीने अज्ञातांविरोधात हत्येचा प्राथमिक गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान गुरुवारी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर हा मुद्दा उपस्थित करीत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावेळी मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांनी आपल्या प्रकरणाकडे लक्ष असल्याचे सांगितले. यासंदर्भात आपण झारखंड उच्च न्यायायलाचे मुख्य न्यायाधीश, महासचिव तसेच रजिस्ट्रार यांच्याशी चर्चाही केल्याचेही न्या. रमणा यांनी म्हटले आहे.