IndiaNewsUpdate : कोरोना लसीच्या दरात केंद्राकडून वाढ

नवी दिल्ली : देशात १६ जानेवारी २०२१ पासून देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर सर्वच राज्यात लसीकरणाची मोहीम प्रगतीपथावर आहे.या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून करोना लसींच्या किंमती वाढवण्यात येत असल्याचे वृत्त आहे.
कोरोना लस बनविणाऱ्या फार्मा कंपन्यांनी सरकारसोबत मिळून लसींची किंमत निश्चित केली होती. यानुसार, कोव्हिशिल्डच्या एक डोससाठी २०० रुपये तर कोव्हॅक्सिनच्या एका डोससाठी २०६ रुपये किंमत निश्चित करण्यात आली होती. मात्र नव्या किंमतीनुसार, कोव्हिशिल्डचा एक डोस २०५ रुपये तर कोव्हॅक्सिनचा एक डोस २१५ रुपये करण्यात आला आहे. अर्थातच कोव्हिशिल्डच्या एका बाटलीसाठी सरकार ५० रुपये अधिक मोजणार आहे (एका बाटलीत १० डोस) तर कोव्हॅक्सिनच्या एका बाटलीसाठी १८० रुपये (एका बाटलीत २० डोस) अधिक मोजावे लागणार आहेत.
दरम्यान १६ जुलै रोजी केंद्र सरकारकडून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला कोव्हिशिल्ड लसीचे ३७.५ कोटी डोस बनवण्याची ऑर्डर देण्यात आली असून भारत बायोटेकला २८.५ कोटी डोस बनवण्याची ऑर्डर देण्यात आली आहे. दरम्यान, देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण ४५ कोटी ०७ लाख ०६ हजार २५७ लसीच्या डोसचा वापर करण्यात आला आहेत. त्यापैंकी ४३ लाख ९२ हजार ६९७ लसीचे डोस बुधवारी एका दिवसात देण्यात आले आहेत.