CoronaUnlockMaharashtra : राज्याच्या कोणत्या २५ जिल्ह्यातील निर्बंध होताहेत शिथिल !!

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेता ज्या ठिकाणी रुग्णसंख्येचं प्रमाण घटत आहे, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
यानुसार, राज्यातल्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. तर उर्वरीत ११ जिल्ह्यांमध्ये कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. यासंदर्भात अंतिम प्रस्ताव सहीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली, तर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तेथील निर्बंध वाढण्यात येतील, असेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, राज्यातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. त्यामध्ये शिथिलता दिलीजाणार आहे.
या ११ जिल्ह्यात निर्बंध जैसे थेचा प्रस्ताव
दरम्यान, निर्बंध हटवण्यात आलेल्या २५ जिल्ह्यांव्यतिरिक्त उरलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये सध्या अस्तित्वात असलेले निर्बंध कायम राहणार असून अशा जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढल्यास किंवा परिस्थिती बिघडल्यास त्या ठिकाणी स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून निर्बंध अधिक वाढवण्याचा देखील निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही राजेश टोपे यांनी सांगितलं. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हे जिल्हे, कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर हे जिल्हे, मराठवाड्यातील बीड तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमधील निर्बंध कायम राहणार आहेत.