AhmadnagarNewsUpdate : नगर जिल्ह्यातील ४३ गावात कडक लॉकडाऊन

अहमदनगर: नगर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पारनेर तालुक्यातील ४३ गावांत तर संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटातील गावांत ३१ जुलै ते १० ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी करोनाचे १ हजार २२४ नवे रुग्ण आढळून आले. आज किंचित घट होऊन ९२० रुग्ण नोंदले गेले. उपचाराधीन रुग्णांची संख्या आता साडेपाच हजारांवर पोहचली आहे.
पारनेर, संगमनेर, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा, जामखेड या तालुक्यांत रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यापैकी पारनेर आणि संगमनेर हे हॉटस्पॉट ठरले आहेत. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आढावा बैठक घेऊन तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना कालच दिल्या आहेत. परिस्थिती सुधारली नाही तर पुन्हा निर्बंध कडक केले जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी या भागाचा दौरा सुरू केला आहे. आज त्यांनी पारनेर आणि संगमनेरला भेटी दिल्या. तेथील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी करोनाचे जास्त रुग्ण आढळून आलेल्या साकूर भागात दहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पारनेर तालुक्यात भेट दिली. या तालुक्यात दुसऱ्या लाटेपासून रुग्णसंख्या जास्त असून ती नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे मधल्या काळात काही उपायही करण्यात आले. त्याचा फारसा फरक पडलेला नाही. आता या तालुक्यात करोना रुग्णसंख्या जास्त असलेल्या ४३ गावांत ३१ जुलै ते १० ऑगस्ट या काळात कडक लॉकडाऊन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या काळात फक्त औषध दुकाने आणि दवाखाने सोडता बाकी सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व तसहसीलदारांना आपापल्या भागात गरजेनुसार कडक उपाय योजना करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.