ParliamentNewsUpdate : संसदेचे कामकाज ठप्प !! विरोधकांची तक्रार थेट लोकांच्या दरबारात नेण्याची मोदींची सूचना

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी भाजप आणि विरोधक यांच्यातील तेढ अधिकच वाढत चालले आहे. सरकार विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाही . त्याची उत्तरे देत नाही त्यामुळे विरोधक संसदेच्या दोन्हीही सभागृहात हंगामा करीत आहेत तर काँग्रेसकडून ना सदनात कामकाज होऊ दिले जाते ना चर्चा…अशी तक्रार आता थेट जनतेच्या दरबारात नेण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत.
आज पुन्हा एकदा संसदेचं कामकाज सुरू झाल्यानंतर कृषी कायदे तसंच पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून विरोधी पक्षांनी राज्यसभेत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सदनाचं कामकाज तीन वेळा स्थगित करण्यात आलं. दरम्यान लोकसभेतही विरोधकांनी सरकारसमोर कृषी कायदे आणि पेगॅसस हेरगिरी चर्चेची मागणी लावून धरली. यामुळे या सभागृहाचे कामकाजही दोन वेळा स्थगित करावे लागले.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या संसदीय दलाची एक बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट विरोधकांवर निशाणा साधला आहे. कोरोना लसीकरणा संदर्भात सर्वपक्षीय दलाच्या बोलावण्यात आलेल्या बैठकीतही काँग्रेस नेते सहभागी झाले नाही. १५ ऑगस्टनंतर या सर्व गोष्टी जनतेपर्यंत पोहचवण्याचे निर्देशच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांशी बोलताना दिले. विरोधी पक्ष सदनाचे कामकाज होऊ देत नाहीत. विरोधकांची ही मानसिकता जनतेसमोर आणणे गरजेचे आहे, असे या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीसाठी एक रोडमॅपही पंतप्रधानांनी यावेळी खासदारांसमोर सादर केला.
दुसरीकडे, विरोधकांकडून विविध मुद्यांवर सरकारला प्रश्न विचारले जात आहेत. ‘लोकसभा आणि राज्यसभेच्या जागा वाढवण्यावर सरकारकडून गंभीरतेनं विचार सुरू आहे का? हे सरकारने स्पष्ट करायला हवे. ज्या खासदारांसाठी संसद भवन बनवले जात आहे. त्यांनाही त्याची रुपरेषा काय असेल हे माहीत नाही’, असे म्हणत काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी भाजपच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे
दरम्यान विरोधी पक्षनेते सदनाची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहेत. पंतप्रधानांविरूद्ध अशोभनीय भाषेत टिप्पणी केली जात आहे. मास्कशिवाय घोषणाबाजी केली जात आहे, हे करोना नियमांचे उल्लंघन आहे, असे राज्यसभेतील भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे.