MaharashtraPoliticalUpdate : राज्यातील पूर परिस्थितीवर बोलले शरद पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्याच्या पूरग्रस्त भागातील परिस्थिती संदर्भात पत्रकार परिषद घेऊन या भागातील स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगत चिंता व्यक्त केली. दरम्यान यावेळी बोलताना पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल शरद पवारांनी काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या दौऱ्याबद्दलही भूमिका मांडली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जबाबादारी आहे, पण इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे टाळावेत, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.
शरद पवार यांची आज मुंबईत नियोजित पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यातील पूर परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत पुरामुळे घरांचे व शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात सात आठ जिल्यात पूरस्थिती आहे. कोकणात घरांचे नुकसान झाले आहे. इतर ठिकाणी शेतीचं नुकसान झाले आहे. सहा जिल्ह्यांमध्ये अधिक नुकसान झाले आहे”, असे पवार यांनी सांगितले.
पूरग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात येणाऱ्या मदतीची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर पूरग्रस्त भागात डॉक्टरांची पथके पाठवणार असून पुराचा फटका बसलेल्या १६ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीट वाटल्या जाणार असल्याचेही पवार म्हणाले. दरम्यान पूरग्रस्त भागात नेत्यांचे दौरे सुरू असून, त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले कि , “पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनी दौरे केले. त्यांचे दौरे लोकांना धीर देण्यास उपयोगी पडतात. त्यामुळे या नेत्यांच्या दौऱ्यावर आमची हरकत नाही. पण, मला असे वाटते की, ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांनी दौरे करून कामात सुसूत्रतेवर लक्ष दिले पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याचे मी स्वागत करतो. कारण त्यांची ती जबाबदारी आहे. पण माझ्यासारखे नेते गेले, तर तिथल्या शासकीय यंत्रणेवर ताण पडतो. पुनर्वसनाच्या कामावरुन लक्ष विचलित होते म्हणून मला असे वाटते की, माझ्यासारख्या इतर नेत्यांनी असे दौरे करणे टाळायला हवे ”, असे पवार यांनी सांगितले.
राज्यातील महापुराच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेला संबोधित करणाऱ्या शरद पवार यांना राऊत यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयीच्या वक्तव्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर पवार म्हणाले कि, ‘महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्यासाठी पुढे येत असेल आणि त्या व्यक्तीला लोकांचा पाठिंबा मिळत असेल तर आम्हाला आनंदच आहे,’ असं पवार म्हणाले.