MaharashtraNewsUpdate : राज्यपालांनी बैठक बोलावली आणि काय झाले तुम्हीच पहा…!!

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मोठी जीवित आणि मालमत्तेची हानी झाली . या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सर्वपक्षीय जनप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. मात्र, भाजपचे आमदार आशीष शेलार यांच्याशिवाय या बैठकीला सर्वपक्षीय आमदार आणि खासदारांपैकी कोणीही उपस्थित राहिले नाही. विशेष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचे आमदार राज भवनाकडे फिरकलेही नाहीत.
केंद्राकडे मदतीचा पाठपुरावा करता यावा याच उद्देशाने राज्यपाल कोश्यारी यांनी ही बैठक बोलावली होती. मात्र, सत्ताधारी पक्षांच्या आमदार खासदारांनी या बैठकीवर एक प्रकारे बहिष्कार टाकल्याचेच चित्र निर्माण झाले.
राज्यपालांच्या बैठकीला सत्ताधारी पक्षांचे कोणीही लोकप्रतिनिधी उपस्थित न राहिल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने सत्ताधारी पक्षांवर टीका केली आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली असून त्यासाठी मदत देण्याऐवजी केवळ राजकारण करणे हाच सत्ताधारी पक्षाचा मुद्दा असल्याचे भाजपने म्हटले आहे. राज्यातील महाविकास आघाडीला केंद्र सरकारकडून मदतही हवी आहे आणि त्यावर राजकारणही करायचे आहे. मात्र, पूरग्रस्तांना मदत करण्यात त्यांना फारशी गरज वाटत नाही. यावरून हे किती संवेदनशील आहेत हेच लक्षात येत असल्याची टीकाही भाजपने केली आहे.