MaharashtraRainUpdate : तळीये गावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट, ग्रामस्थांना दिला धीर !!

महाड : अतिवृष्टीमुळे दरड कोसळून उद्ध्वस्त झालेल्या महाड तालुक्यातील तळीये गावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण गावची पाहणी करून तेथील गावकऱ्यांशी संवाद साधला. ‘तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचे पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांना धीर दिला.
मुख्यमंत्री म्हणाले कि , जे काही घडलं आहे ते आक्रीत आहे. आजकाल पावसाळ्याची सुरुवात सुद्धा चक्रीवादळाने होते. ही आपत्ती इतकी मोठी होती की मदतीला पोहोचताना जवानांना आणि बचाव पथकांना अनेक अडचणी आल्या. कारण सगळ्या सामुग्रीनिशी त्यांना बचावकार्य करायचे होते . राज्य शासन आपत्तीचा सामना करण्यासाठी तयार होते. केंद्र सरकारने देखील सहाय्य केले. लष्कर, एनडीआरएफ सर्वांनीच मदत केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले . ‘अशा दुर्घटना पाहता डोंगर उतार आणि कडेकपाऱ्यांत राहणाऱ्या वाड्यावस्त्यांना स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल,’ असं त्यांनी यावेळी सांगितलं.
दुपारी सव्वा दोनच्या सुमारास मुख्यमंत्री तळीये गावात पोहोचले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी त्यांच्यासोबत होते. मुख्यमंत्री भर पावसात चिखलातून वाट काढत घटनास्थळी पोहोचले.
मुख्यमंत्री घटनास्थळी येताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतले . त्यांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. दुर्घटनाग्रस्त तळीयेची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. ‘तळीये ग्रामस्थांना संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांचे योग्य पुनर्वसन केले जाईल, असे ते म्हणाले.