MumbaiCrimeUpdate : पोलीस कोठडीला आक्षेप घेऊन राज कुंद्रा उच्च न्यायालयात

मुंबई : अश्लील चित्रपट आणि वेब सिरीज निर्मिती प्रकरणात राज कुंद्राला न्यायालयाने २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र न्यायालयाने सुनावलेली पोलीस कोठडी ही कायदेशीर नसल्याचे सांगत राज कुंद्रा यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये या सुनावणीविरोधात याचिका दाखल केली आहे. आपल्याला बेकायदेशीपणे पोलिसांनी ताब्यात ठेवल्याचे राज कुंद्रा यांनी याचिकेमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे आपल्याला कोरोना संसर्गाचे कारण देत कुंद्रा यांनी कोठडीमध्ये वाढ करण्यात येऊ नये असे आपल्या याचिकेत म्हटले आहे.
आज मुंबई जिल्हा न्यायालयाने राज कुंद्रा आणि त्यांचे सहकारी रायन तोरपे यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांनी आज जिल्हा न्यायालयासमोर कुंद्रा आणि तोरपे यांना हजर केले . त्यावेळी मुंबई पोलिसांनी सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली. ऑनलाइन बेटींगमध्ये पॉर्नोग्राफीतून मिळवलेला पैसा वापरण्यात आल्याची शक्यात व्यक्त करत मुंबई पोलिसांनी अधिक तपासासाठी सात दिवसांची कोठडी द्यावी अशी विनती केली होती. न्यायालयाने त्यानुसार या दोघांना चार दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र आता या आदेशाला कुंद्रा यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले आहे.
कुंद्रा यांनी परिनाम लॉ असोसिएट्सच्या माध्यमातून याचिका दाखल केली असून ज्या कलमांखाली अपल्याला अटक करण्यात आली आहे त्यामध्ये जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा होऊ शकते असाही उल्लेख केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा दाखला देत आपल्याला अशाप्रकारे कायदा आणि नियमांचे पालन न करता पोलीस कोठडीत ठेवणे हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे या याचिकेत म्हटले आहे. कुंद्रा यांनी कोरोनाचेही कारण या याचिकेमध्ये दिले आहे. भारताच्या सरन्यायाधिशांनी एका निकाला दरम्यान तुरुंगामध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो असे निरिक्षण नोंदवले होतं त्याचा दाखला कुंद्रा यांनी दिला आहे. असं ‘बेंच अॅण्ड बार’ने म्हटले आहे.
पुढील सुनावणी २८ जुलैला
राज कुंद्रांच्या यस बँक खात्यावरुन युनायटेड बँक ऑफ आफ्रिकेतील खात्यावर किती पैसे वळवण्यात आले यासंदर्भातील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी न्यायालयाने सांगितलं. याच तपासासाठी पोलिसांना आता न्यायालयाने चार दिवसांचा कालावधी दिला असून २८ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
दरम्यान राज कुंद्रांवर एवढे गंभीर आरोप लावण्यात आलेले असतानाही ते तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचे सांगितले जात आहे. तपासादरम्यान कुंद्रा हे सहयोग करत नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणे आहे. अनेक प्रश्नांना उत्तर देण्यास कुंद्रा टाळाटाळ करत आहेत. तसेच ते सतत त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळत आहे. मी कोणताही अश्लील चित्रपट बनवलेला नाही असे ते वारंवार सांगत आहेत. मात्र राज कुंद्रांविरोधात गुन्हे शाखेकडे सबळ पुरावे असल्याचे पोलिसांनी अधिक स्पष्ट केले आहे. कुंद्रा सध्या भायखळ्यातील तुरुंगात आहे.