MaharashtraNewsUpdate : मुख्यमंत्री स्वतः कार चालवत निघाले वारीला, यंदाच्या महापूजेचा मान विणेकऱ्याला…

मुंबई : यंदाच्या आषाढी वारीच्या महापूजेचा मान वारकऱ्यांचे प्रतिनिधी विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय ७१ वर्षे) आणि इंदुबाई केशव कोलते (वय ६०) यांना मिळाला असून ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत महापूजा करणार आहेत. केशव कोलते हे गेल्या २० वर्षांपासून मंदिरात विणेकरी म्हणून सेवा देत आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा होत आहे . या पूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह आपल्या मातोश्री या निवासस्थानावरुन दुपारी अडीचच्या सुमारास स्वत: गाडी चालवत निघाले आहेत.
पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात उद्या, मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री सपत्निक पूजा करणार आहेत. मुख्यमंत्री पुढील ८ ते ९ तासांमध्ये पंढरपुरात दाखल होतील असा अंदाज आहे. त्यानंतर मध्यरात्रीनंतर पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूज पार पडणार आहे.
कोरोनाचा काळ लक्षात घेऊन सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री मंत्रालयात जातानाही चालकाला टाळून स्वत:च गाडी चालवतात. गेल्या वर्षी देखील मु्ख्यमंत्री ठाकरे स्वत:च गाडी चालवत पंढरपुरात गेले होते. दरम्यान तुफान पाऊस कोसळत असतानाही मुख्यमंत्री आपल्या रेंज रोव्हर गाडीने पंढरपूरला निघाले आहेत. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, पुणेसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काल पासून मुसळधार पाऊस पडत आहे.