#MumbaiNewsUpdate : पोलिसांची नजर चुकवून धबधब्यावर जाणं पडलं महागात…

नवी मुंबईतील खारघर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पांडवकडा धबधब्यावर सुमारे 120 पर्यटक पाऊसामुळे अडकले होते. पोलिस आणि अग्निशमन अधिकाऱ्यांच्या पथकाने या पर्यटकांची सुटका केली असून, यात सुमारे 78 महिला आणि 5 मुलं असल्याचे वृत्त आहे. हे पर्यटक नवी मुंबईतील खारघरमधील आहेत.
नवी मुंबईसह उपनगरात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वी पावसाळ्यात झालेल्या अपघातांमुळे पनवेल परिसरातील खारघर डोंगर आणि पांडवकडा धबधब्यावर जाण्यास मनाई आहे. तथापि, रविवारी, खारघरमधील सेक्टर 5 पासून आसपासच्या भागातील लोकांनी पोलिसांची नजर चुकून डोंगराकडे जाण्यास यश मिळविले. मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातून वाहणारा ओढा दुतर्फी भरून वाहू लागल्याने ओढ्याला पूर आला होता. त्यामुळे हे सर्व पर्यटक धबधब्याजवळ अडकले. अखेर सायंकाळी सातच्या सुमारास खारघर अग्निशमन जवानांनी जवळपास 120 पर्यटकांना ओढ्यावर सीडी लावून सुखरूप बाहेर काढले.