IndiaNewsUpdate : संघाची बदलती नीती , आता मुस्लीम वस्त्यांमध्येही संघाच्या शाखा

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी संघ प्रमुख मोहन भागवत यांनी हिंदू – मुस्लिम एकाच असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता प्रॅक्टिकल भूमिका घेत मुस्लीम वस्त्यांमध्येही संघाच्या शाखा सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असणाऱ्या चित्रकूटमध्ये गेल्या पाच दिवसांपासून सुरु असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचार बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या पाच दिवसांपासून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असणाऱ्या चित्रकूटमध्ये सुरु असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचार बैठकीचा आज शेवटचा दिवस होता. या बैठकीमध्ये संघटनेला मजबूत करण्यासाठी काही कठोर निर्णय घेण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये संघटनेची पाळंमुळं मजबूत करण्यासाठी राज्याची तीन खंडांमध्ये विभागणी करुन काम करण्यात येणार असून कोलकातामध्ये असेल, वर्धमान आणि सिलीगुडीमधून अशी या खंडाची नावे आहेत.
दरम्यान चित्रकूटमध्ये पार पडलेल्या या बैठकीमध्ये कोरोना कालावधीत बंद पडलेल्या संघाच्या कार्यक्रमांबरोबरच शाखाही पुन्हा सुरु करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आता संघाने देशभरातील मुस्लीम वस्त्यांमध्ये आपल्या शाखा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून आता गावागावांमध्ये पोहचवण्यासाठी या बैठकीमध्ये रणनिती आखण्यात आली आहे. तसेच केवळ हिंदूच नाही तर मुस्लिमांनाही संघाशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यावर भर देण्यासंदर्भातील धोरणही या चिंतन बैठकमध्ये निश्चित करण्यात आले आहे.