WorldNewsUpdate : दलाई लामा यांचा वाढ दिवस साजरा केल्यामुळे चीन पुन्हा आक्रमक

नवी दिल्ली : प्रसिद्ध बौद्ध धम्मगुरु आणि तिबेट सरकारचे प्रमुख दलाई लामा यांचा भारतात वाढदिवस साजरा केल्याने चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने देमचुक येथील सिंधु नदीजवळ विरोध फलकबाजी आणि चीनी झेंडे फडकावून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे वृत्त आहे. दि. ६ जुलै रोजी घडलेल्या या घटनेच्या दिवशी चीने लष्करासोबत काही नागरिकही उपस्थित होते असे सांगण्यात येत आहे. या दिवशी देमचुकमधील स्थानिक नागरिक बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा करत होते. यावेळी तिथे पाच वाहने पोहोचली आणि दीड तास चीनच्या लष्करने दलाई लामा यांच्या निषेधाचे फलक या भागात झळकावल्याचे वृत्त आहे.
तिबेट सरकारचे प्रमुख आणि बौद्ध धम्मगुरु दलाई लामा गेल्या अनेक वर्षांपासून भारतात राहात आहेत. त्यामुळे चीनने अनेक वेळा या प्रकरणी आपला विरोध दर्शवला आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८६ वर्षीय दलाई लामा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचबरोबर दलाई लामा यांच्याशी फोनवर बोलणे झाल्याचे जाहीररित्या सांगितले होते. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून आतापर्यंत पहिल्यांदाच त्यांनी याबाबत जाहीररित्या सांगितले आहे. “दलाई लामा यांच्याशी फोनवरुन बोलणे झाले . त्यांना ८६ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो ही प्रार्थना केली”, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले .
दरम्यान तिबेट सरकारकडून लवकरच दलाई लामा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील असे सांगण्यात आले आहे. कोरोना स्थिती निवळल्यानंतर ही भेट होईल असे सांगण्यात आले आहे. मोदींनी दलाई लामा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत चीन एकप्रकारे इशाराच दिला आहे. याउलट चीनमधील कम्युनिस्ट पार्टीला नुकतीच १०० वर्षे झाली, त्याबद्दल मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही शुभेच्छा दिल्या नाहीत.
चीनने एप्रिल २०२० मध्ये लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारत-चीन दरम्यान तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. यावेळी दोन्ही सैन्यदलात अनेकदा धक्काबुक्की झाल्याची प्रकरणे समोर आली होती. दोन्ही देश सीमावाद सामंजस्यपणे सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या मात्र कोणताही मार्ग निघू शकलेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये चर्चेची दारे बंद आहेत हे उल्लेखनीय.