MonsoonNewsUpdate : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता

पुणे : राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून रविवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूरसह धुळे, सातारा, सोलापूर, नांदेड, परभणी आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत पावसाळा सुरुवात झाली आहे. आज पुन्हा राज्यात ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हीच स्थिती पुढील पाच दिवस राज्यात कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
दरम्यान आज पुण्यासह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. आज रायगड, रत्नागिरी सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. तर पुणे, पालघर, ठाणे, मुंबई, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भाग वगळता आज महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील आणखी चार दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहणार आहे.
आज सकाळपासूनचं पुणे, ठाणे, मुंबई आणि उपनगरात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. आज दिवसभर मुबंईत अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू होती. सायंकाळनंतर मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मागील सहा तासांत दक्षिण मुंबई, पूर्व उपनगरात आणि बोरीवली परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत.
१२ जुलै, महाराष्ट्र राज्यात येत्या 5 दिवसा साठी IMD ने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कृपया IMD चे अपडेट्स पाहत राहा. pic.twitter.com/w3yXQ77O0R— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 12, 2021