MaharashtraPoliticalUpdate : चर्चेतली बातमी : शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचं चाललंय काय ?

मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री पाळत ठेवतात !!
मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्यावर मुख्यमंत्री आणि गृहखात्याकडून पाळत ठेवली जात असल्याच्या आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ शिवसेनेनंही पटोले यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पटोले यांना काही बोलायचं असेल तर खासगीत बोलावे, चव्हाट्यावर बोलू नये, असा सल्लाच शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद सावंत यांनी दिला.
वृत्त वाहिन्यांशी बोलताना अरविंद सावंत यांनी नाना पटोले यांच्या विधानावर आश्चर्य व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे. ‘नाना पटोले हे एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते विधानसभा अध्यक्ष राहिले आहेत त्यामुळे आपण काय बोलतोय याचे भान राहिले पाहिजे. नाना पटोले यांना जे काही बोलायचे आहे ते त्यांनी खाजगीत बोलावे चव्हाट्यावर बोलू नये, असा सल्ला पटोले यांना दिला आहे. सावंत यांनी पुढे म्हटले आहे कि , ‘तुम्हाला काही अडचण आहे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किंवा बाळासाहेब थोरात यांना सांगा पण असे वक्तव्य करणे योग्य नाही. अशा लोकांमुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा खराब होणार नाही. याचा विचार केला पाहिजे, त्यांना कसं थांबवायचे हे आता त्याचा पक्ष आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील.
अजित पवार भडकले
दरम्यान, नाना पटोले यांनी आपल्याच सरकारवर पाळत ठेवण्याचा केलेला आरोप हा महाविकास आघाडीला सुरुंग लागत असल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती समोर आली आहे. नाना पटोले यांच्यावर अशा कोणत्याही प्रकारची पाळत ठेवण्यात आली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काँग्रेसच्या नेत्यांसोबत बोलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांत नाना पटोले यांच्याकडून सातत्याने आरोप होत असल्यामुळे राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली आहे.
या वादावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते यांनी म्हटले आहे कि , नाना पटोले यांच्यावर पाळत ठेवली जात नाही. जो नेता असतो त्याच्या माहिती गोळा केली जाते. नाना पटोले यांनी ही माहिती करून घ्यावी. आवश्यकता वाटली तर याबद्दलची माहिती काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री यांच्याकडून घ्यावी त्यांना किंवा त्यांच्या नेत्यांना पोलीस बंदोबस्त नको असेल तर त्यांनी तसा अर्ज करावा.
काय आहे कळीचा मुद्दा ?
‘त्यांच्याकडे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदाचा कार्यभार आहे. त्यामुळे यंत्रणांना सर्व रिपोर्ट त्यांना द्यावे लागतात. राज्यात कुठे काय चालू आहे, आंदोलनं कुठे होत आहे. याबद्दलची प्रत्येक अपडेट त्यांना द्यावी लागत असतात. मी कुठे काय करतो, हे सुद्धा त्यांना माहीत असते’, तसेच, राज्यात काँग्रेस वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. पक्ष आणखी बळकट करण्याचा आम्हाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे. याबद्दल त्यांना माहिती असून ते कुठे ना कुठे आपल्याला पिंजऱ्यात आणायचा प्रयत्न करणार’ असे पटोले यांचे म्हणणे आहे.
आपल्या वक्तव्याचा विपर्यास : नाना पटोले
नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास लावण्यात आला असल्याचं म्हटलं आहे. माझे आरोप राज्य सरकारवर नव्हे तर केंद्र सरकारवर होते असं सांगत नाना पटोले यांनी वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचं सांगितलं आहे. पाळत ठेवण्याबाबत माझा सरकारवर कोणताही आरोप नसून मुंबईत आल्यावर यावर सविस्तर प्रतिक्रिया देईन असं नाना पटोले म्हणाले आहेत.