IndiwsUpdate : जाणून घ्या मोदींच्या मंत्रिमंडळाचे चारित्र्य , २४ जणांच्या विरोधात खून आणि खुनाच्या प्रयत्नाचे गंभीर गुन्हे !!

नवी दिल्ली : बुधवारी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पार पडला. या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकूण ४३ मंत्र्यांनी शपथ घेतली. या विस्तारानंतर केंद्रीय मंत्र्यांची एकूण संख्या ७८ वर पोहोचली आहे. या मंत्र्यांपैकी तब्बल ४२ टक्के म्हणजेच ३३ मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येतेय. त्यात २४ जणांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. एडीआर अर्थात असिसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने नुकताच यासंदर्भातला अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रिमंडळासंदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे.
३५ वर्षीय केंद्रीय गृहराज्यमंत्री निसित प्रामाणिक यांच्या विरोधात भादंविच्या कलम ३०२ नुसार हत्येचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय जॉन बारला, पंकज चौधरी आणि व्ही मुरलीधरन या तिघांविरोधातही हत्येचा प्रयत्न केल्याचा (भादंवि ३०७) गुन्हा दाखल असल्याचं एडीआरच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
मंत्रिमंडळातील 90 टक्के मंत्री कोट्यधीश
दरम्यान मोदींच्या मंत्रिमंडळातील ७८ मंत्र्यांपैकी ७० मंत्री म्हणजेच जवळपास ९० टक्के मंत्री हे कोट्यधीश असल्याचा दावा एडीआरनं अहवालात केला आहे. या दाव्यानुसार मंत्र्यांची प्रत्येकी संपत्ती ही सरासरी १६.२४ कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे, पियुष गोयल, नारायण राणे आणि राजीव चंद्रशेखर याा मंत्र्यांचा समावेश आहे. या चारही मंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये ५० कोटींहून जास्त संपत्ती असल्याचं नमूद केलं आहे.
1 कोटीहून कमी संपत्ती असलेले मंत्री
मोदी यांच्या मंत्रिमंडळातील केवळ ८ मंत्र्यांची संपत्ती ही १ कोटीपेक्षा कमी असल्याचं एडीआरनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. यामध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांच्या नावे फक्त ६ लाखांची संपत्ती आहे. जॉन बारला यांच्या नावे १४ लाख आणि कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्या नावे २४ लाखांची संपत्ती आहे.
सुशिक्षित मंत्री ८२ टक्के
केंद्रीय मंत्रिमंडळात एकूण ८२ टक्के म्हणजेच ६४ मंत्री हे सुशक्षित असल्याचं एडीआरच्या अहवालात म्हटलं आहे. या ३४ मंत्र्यांचं शिक्षण पदवी किंवा त्यापेक्षा जास्त आहे. १७ मंत्री पदवी, २१ मंत्री पदव्युत्तर तर ९मंत्री डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलेले आहेत. ८ वी ते १२ वी दरम्यान शिक्षण घेतलेले १५ टक्के म्हणजेच १२ मंत्री आहेत. एकूण दोन मंत्र्यांनी डिप्लोमा केला आहे.