BeedNewsUpdate : खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्याने भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

बीड : मोदी सरकारच्या विस्तारित मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे आपण नाराज नाही असे पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले असले तरी त्यांच्या नाराजीचे पडसाद बीड जिल्ह्यामध्ये उमटू लागले आहेत. हा असंतोष आणि नाराजी पक्ष नेतृत्वाच्या लक्षात यावा म्हणून जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी राजीनामे देत आहेत. आज दिवसभरात २५ जणांनी राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे राजीनामा देणाऱ्यांमध्ये बीड जिल्ह्यातील सात तालुका भाजप अध्यक्षांचा समावेश असल्याचे वृत्त आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना घेतले जाईल अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र ऐनवेळेवर मंत्रिपदावरून डावलल्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भाजप कार्यकर्ते नाराजी सत्र सुरू होताच जिल्ह्यातील ७ तालुका अध्यक्षांनी राजीनामे दिले आहे. भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सर्व तालुकाध्यक्षांनी आपले राजीनामे सादर केले.
दरम्यान काल भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज जिल्ह्यातील जवळपास २४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. आज शिरूर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, सविता रामदास बडे यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाचा तर प्रकाश खेडकर यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.