IndiaNewsUpdate : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात कोण कोण ?

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या विस्तारित केंद्रीय मंत्रिमंडळात तब्बल २० नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे नेते नारायण राणे यांच्यासह अनेक नेत्यांना दिल्लीचे निमंत्रण आले असून मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावरच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत यांची कर्नाटकाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे थावर चंद यांच्याबरोबरच इतर काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
देशात पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मंडळाचा विस्तार करण्यात येत आहे. सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा विस्तार केला जात असून काही राज्यांवर विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपातील वरिष्ठ नेते आणि वरिष्ठ मंत्र्यांसोबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात २० नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे वृत्त असून, यात काही नावे स्पर्धेत आहेत.
यांच्या नावांची चर्चा
मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्याबरोबरच हिना गावित, रणजितसिंह निंबाळकर आणि प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा आहे. याशिवाय ज्योतिरादित्य शिंदे, सर्वानंद सोनोवाल, नारायण राणे, शांतनु ठाकूर, पशुपती पारस, सुशील मोदी, राजीव रंजन, संतोष कुशवाह, अनुप्रिया पटेल, वरुण गांधी, प्रविण निषाद यांची नाव चर्चेत आहेत.
दरम्यान नितीश कुमार यांच्या जदयूने चार मंत्रिपदाची मागणी केल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे या सगळ्यांचा सुवर्णमध्ये मोदी सरकार मंत्रिमंडळ विस्तार करताना कसा साधणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळ विस्तार करताना केंद्र सरकार आणि भाजपाकडून उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि इतर निवडणुका असलेल्या राज्यांवर लक्ष्य केंद्रीत केले जाणार आहे.