Maharashtra assembly Update : ‘एसईबीसी’ आणि एमपीएससी परीक्षा दिलेल्या तरुणांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने तरुणाने आत्महत्या केल्याचा मुद्दा आज विधी मंडळाच्या अधिवेशनात उपस्थित होताच राज्य शासनाने महत्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून एसईबीसी अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांची मयोवर्यादा ४३ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अशोक चव्हाण यांनी विधानपरिषदेत बोलताना ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने यासाठी मान्यता दिली असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.
राज्य सेवा आयोगाच्या सर्व रिक्त जागा ३१ जुलैपर्यंत भरणार – अजित पवार
दरम्यान या अधिवेशनात विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससीची सर्व रिक्त पदे ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्याची घोषणा केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी एमपीएससी परीक्षेच्या मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात उत्तर दिले.
अजित पवार म्हणाले, “सभागृहाचा पहिला दिवस असतानाच विरोधी पक्षनेत्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण स्वप्निल लोणकर या उमेदवाराच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. ही बाब वेदनादायी आहे. अशी घटना कुणाच्याही बाबतीत घडू नये, अशी सरकारची भूमिका आहे. मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात चर्चा केली,” असं अजित पवार यांनी सांगितले.
स्वप्निल लोणकरबद्दल खुलासा करताना पवार पुढे म्हणाले कि , मला विरोधकांसह राज्यातील जनतेला सांगायचं की, स्वप्निल लोणकर याने २०१९ मध्ये राज्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा दिली होती. मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर २०१९ रोजी झाली. परीक्षेचा निकाल २८ जुलै २०२० रोजी लागला. या परीक्षेत ३,६७१ उमेदवार पात्र ठरले. १२,०० पदांसाठी ही परीक्षा झाली होती. दरम्यान, एससीबीसी प्रवर्गासंदर्भातील निर्णयाला ९ सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे सर्व प्रक्रिया थांबवावी लागली. परिणामी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांच्या मुलाखती होऊ शकल्या नाहीत.
याच दरम्यान, कोविडची साथ आली. यात एमपीएससी आयोगाला स्वायत्तता दिलेली असल्याने आयोगाने परीक्षा रद्द केल्या. मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. आयोगाच्या अध्यक्षांशी संपर्क केला. स्वायत्तता दिलेली असली, तरी अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा निर्णय योग्य नाही, असं मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षांना सांगितले अशी माहितीही अजित पवार सभागृहाला दिली. दरम्यान सरकारने स्वप्निल लोणकरची आत्महत्या गांभिर्याने घेतलेली आहे. आज सभागृहात सांगू इच्छितो की, सरकार ३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या संपूर्ण रिक्त जागा भरेल. यात कोणताही अडथळा येणार नाही,” अशी घोषणा अजित पवार यांनी केली.