CoronaIndiaUpdate : देशात कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट मध्येच , एसबीआयचा अहवाल

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट संपत असतानाच देशात लवकरच तिसरी लाट येईल, असा अंदाज एसबीआयने आपल्या अहवालात दिला आहे. कोरोनाची लाट देशात देशात पुढच्याच महिन्यात म्हणजे ऑगस्ट मध्येच येईल असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात कोरोनाची स्थिती अधिक बिकट असेल असेही या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी लसीकरणावर अधिक भर द्यावा लागणार आहे.
या अहवालानुसार दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत सर्वाधिक लोकांना कोरोनाची लागण होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र दुसऱ्या लाटेइतकी तिसरी लाट गंभीर असेल, याबाबत ठोस सांगता येत नाही. दरम्यान लसीकरण मोहिमेचा मोठा फायदा लोकांना होईल. तसेच दुसऱ्या लाटेच्या तुलनेत मृत्यूची संख्या कमी असेल असेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान यापूर्वी एसबीआयने आपल्या अहवालात करोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत भाकीत वर्तवले होते. त्यानुसार भारतात दुसऱ्या लाटेची स्थिती जाणवली होती. अहवालात ७ मेपासून करोना रुग्णांची संख्या वाढेल असं सांगण्यात आले होते . त्यानुसार देशात कोरोनाची दुसरी लाट एप्रिल महिन्यात सुरु झाली आणि मे महिन्यात करोना रुग्णसंख्येत वाढ झाली.
या लाटेत दिल्ली, महाराष्ट्र, केरळ या राज्यांना सर्वाधिक झळ पोहोचली. सध्याच्या अहवालानुसार जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जवळपास १० हजार रुग्ण आढळून येतील. तर ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात ही संख्या वाढलेली असेल. या तिसऱ्या लाटेचा प्रभाव ९८ दिवसांपर्यंत जाणवेल असेही एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे.