PuneNewsUpdate : कला दिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्याप्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा , एक गजाआड

पुणे : सिनेसृष्टीतील कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांनी आपल्या व्हिडिओमध्ये केलेल्या निवेदनानुसार त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी राजेश साप्ते यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर, कलाविश्वासात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी त्यांच्या पत्नी सोनाली राजेश साप्ते यांनी वाकड पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत ही कारवाई केली.
पुण्याच्या वाकड परिसरातील फ्लॅटवर कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती. दरम्यान, साप्ते यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट आणि एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यातूनच त्यांना काही व्यक्ती त्रास देत असल्याचे समोर आले होते . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच आरोपींनी कट रचून राजेश साप्ते यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच, लेबरला कामावर येऊ देणार नाही. शिवाय व्यवसायिक नुकसान करण्याची ही धमकी देण्यात आली होती, असे मयत राजेश यांच्या पत्नी सोनाली सापते यांनी फिर्यादीत म्हटले आहे. राजेश यांना दहा लाख रुपये आणि प्रत्येक प्रोजेक्टमागे एक लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. राजेश यांना अडीच लाख रुपये देण्यास भागही पाडले होते , असे ही तक्रारीत म्हटले आहे.
पाच आरोपींपैकी चंदन रामकृष्ण ठाकरे याने विश्वासघात करून वेळोवेळी फसवणूक केली असल्याचे त्यांच्या पत्नीने म्हटले आहे. पाचही आरोपींच्या जाचाला कंटाळून राजेश साप्ते यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास देण्यात आल्याचे सोनाली यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नरेश विश्वकर्मा (मिस्त्री) , गंगेश्वर श्रीवास्तव (संजुभाई), राकेश मौर्य, चंदन रामकृष्ण ठाकरे आणि अशोक दुबे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, चंदन रामकृष्ण ठाकरे याला अटक करण्यात आली आहे.