MaharashtraPoliticalUpdate : नवाब मलिक म्हणतात ” पवार कृषी कायद्यावर तसे बोललेच नाहीत..”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केंद्राच्या वादग्रस्त कृषी कायद्यांच्या संदर्भात केलेले विधान ” तसे ” नव्हतेच असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी शरद पवारांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. त्यांनी भूमिका बदललेली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत, असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकार मांडणार का, असा प्रश्न शरद पवारांना पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना पवारांनी ‘कायदे रद्द करण्याची गरजच वाटत नसल्याचे म्हटली होते. हि बातमी टीव्ही आणि इतर सर्व माध्यमांनी दिली. त्याची दखल सरकारी वाहिनी- दूरदर्शननेही घेतली होती.
दरम्यान या कायद्याविरोधात गेल्या सहा महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत असून त्यातील अनेक तरतुदी या निश्चितच आक्षेपार्ह आहेत. मात्र सरसकट कायदेच रद्द करावेत, असे आपल्याला वाटत नसल्याचे पवारांनी सांगितले. ज्या बाबी आक्षेपार्ह आहेत, त्या काढून टाकणे किंवा त्यामध्ये सुधारणा करणे अधिक संयुक्तिक राहिल, असे मत पवारांनी व्यक्त केले, असे वृत्त होते. पवारांच्या या कथित वक्तव्याचे सरकारतर्फे कृषी मंत्री तोमर यांनी स्वागतही केले. ‘शरद पवारांचं विधान योग्यच असून सरकारदेखील पहिल्यापासून हीच भूमिका मांडत असल्याची’ प्रतिक्रिया केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिली. शेतकऱ्यांनी त्यांचे सर्व आक्षेप मांडावेत आणि त्यांना आक्षेपार्ह वाटणाऱ्या तरतुदींचा पुनर्विचार करायला सरकार तयार असल्याचा पुनरुच्चार तोमर यांनी केला आहे.
शरद पवार यांच्या या वक्तव्याची देशभर चर्चा सुरु झालेली असताना शुक्रवारी रात्री नवाब मलिक यांनी ‘शरद पवार केंद्रीय कृषी कायद्याबद्दल असे बोललेच नाहीत’, असा पवित्रा घेतला आहे. उलट केंद्र सरकार पवारांचं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने वापरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शरद पवार राज्याच्या कृषी कायद्याविषयी बोलत होते, असा खुलासा मलिक यांनी केला आहे.