IndiaNewsUpdate : व्वा मोदीजी व्वा !! आता गरिबांना देण्यात येणाऱ्या धान्याच्या पिशव्यांवरही असेल मोदी आणि कमळाचे चित्र !!

नवी दिल्ली : लसीकरण प्रमाणपत्रावर छापण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आधीच चर्चेत असताना आता गरिबांना पुरवण्यात येणाऱ्या ‘रेशन’वरही मोदींचा फोटो छापण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. खासकरून भाजपाशासित राज्यांत गरिबांना देण्यात येणाऱ्या या धान्याच्या पिशव्यांवरही नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्र्यांचा फोटो लावण्याचे निर्देश भाजपकडून जारी करण्यात आले आहेत. तसेच ज्या पिशव्यांतून हे पाच किलो धान्य गरिबांना दिले जाणार आहे त्यावरही भाजपाचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाचे फोटो लावण्याचे निर्देशही भाजपाशासित राज्यांत देण्यात आले आहेत.
याबाबत भाजपाचे महासचिव अरुण सिंह यांच्याकडून भाजपाशासित राज्यांना यासंबंधी निर्देश देणारे एक पत्रेही पाठवण्यात आले आहेत. या आधी देशभरात राबवण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेदरम्यान नागरिकांना देण्यात येणाऱ्या लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आला आहे. याला विरोधी पक्षांनी वेळोवेळी विरोधही दर्शवला आहे. दरम्यान या प्रमाणपत्रावर काही दिवसांपूर्वी, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल यांसारख्या काही गैर-भाजपशासित राज्यांत लसीकरण प्रमाणपत्रावरचा नरेंद्र मोदींचा फोटो हटवून मुख्यमंत्र्यांचा फोटो वापरण्यात आला होता.
या सर्व मोहिमेच्या अंमलबजावणीची जबाबदारी भाजपने स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. या शिवाय गैरभाजप शासित राज्यांतही भाजपाकडून धान्यवाटप करण्यात येणार आहे. या धान्याच्या पाकिटांवर कमळाचे फोटो दिसणार आहेत. तर बॅनरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या फोटोऐवजी स्थानिक भाजपाच्या नेत्यांचे फोटो लावण्यात येतील. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही याचा प्रचार करण्यात येणार आहे. पक्षाकडून नोव्हेंबर २०२१ पर्यंत ही योजना सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.