MaharashtraNewsUpdate : चर्चेतली बातमी : पुन्हा एकदा संभाजी भिडे , कोरोनमुक्तीचा असा दिला महामंत्र !!

सांगली: शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असतात आताही त्यांनी असेच वक्तव्य केले आहे. पंढरपूरची आषाढी वारी झाल्यावर देशातील नव्हे, तर जगातील कोरोना आटोक्यात येईल, नामशेष होईल, असे विधान यांनी आता केले आहे. आषाढी वारीसाठी संभाजी भिडेंनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले . त्यावेळी त्यांनी हे विधान केले . वारी करण्यास परवानगी देण्याचे आवाहन त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केले . पंढरपूरच्या वारीनंतर जगातील करोना नामशेष होईल असे संभाजी भिडे जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले.
“पंढरपूरची आषाढी वारी झाल्यानंतर देशातीलच नव्हे, तर संपूर्ण जगातील कोरोना नामशेष होईल. संतांच्या परंपरा जपल्याने सगळी विघ्नं नाहीशी होतात. त्यामुळे पायी वारी करण्यास परवानगी द्यावी,” अशी विनंती संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. “आपल्या सर्वांना भारत कोरोनामुक्त व्हावा असं वाटतं आणि ते होणार आहे. त्यामुळे पायी वारीला परवानगी द्यावी,” असंही ते पुढे म्हणाले.
दरम्यान चर्चेचे निमित्त करून केवळ १०० जणांना घेऊन पालख्या निघाव्यात असं आश्वासन दिले होतं. प्रत्यक्षात मात्र १०० जणांची पायी वारीही अमान्य करून पुन्हा बसनेच संताच्या पादुका पंढरपूरपर्यंत नेण्याचे निश्चित करण्यात आलं आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. “शासनाकडून वारकर्यांचा विश्वासघात झाला असून ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी शासनाचा विरोध झुगारुन पायीच वारी करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे त्यांना फलटण येथे स्थानबद्ध करण्यात आलं आहे. वारकरी सांप्रदायकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे,” असंही ते म्हणाले आहेत.