CoronaNewsUpdate : डेल्टा प्लस व्हेरिअंट लहान मुलांसाठी घातक नाही : डॉ. शेखर मांडे

मुंबई : देशात कोरोनाबाधितरुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिअंट अर्थातच डेल्टा प्लस व्हेरिअंट अत्यंत घातक असल्याचा दावा केला जात आहे. पण याबाबत दिलासा देणारा अहवाल सीएसआयआरच्या शास्त्रज्ञांनी केंद्र सरकारला दिला असून डेल्टा प्लस व्हेरिअंट लहान मुलांसाठी घातक नसल्याचे या अहवालात म्हटले आहे.
महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे रुग्ण वाढत असल्याने राज्यसरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन निर्बंध आणायला सुरुवात केली आहे. राज्यातील अनेकांनी डेल्टा प्लस व्हेरिअंटचा धसका घेतला असून समाजात भीतीचे वातावरण आहे. पण हा कोराना विषाणूचा नवीन व्हेरिअंट धोकादायक नसल्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. डेल्टा किंवा डेल्टा प्लस व्हेरिअंट खरंच धोकादायक आहे का? याबाबत सीएसआयआरचे प्रमुख डॉ. शेखर मांडे यांनी दिली आहे.
डॉ. शेखर मांडे यांच्या मते, डेल्टा प्लस व्हेरिअंट धोकादायक नाही. या व्हेरिअंटचा लहान मुलांवर कोणताही परिणाम होत नसल्याची माहितीही डॉ. मांडे यांनी दिली आहे. याबाबतची माहिती देताना त्यांनी सांगितलं की, कोरोना विषाणूच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिअंटवर सीएसआयआरच्या शास्त्रज्ञांनी संशोधन केलं आहे. त्यामुळे डेल्टा प्लस व्हेरिअंट घातक नसून घाबरण्याचं काहीही कारण नसल्याची त्यांनी म्हटलं आहे. पण नेहमीप्रमाणे मास्क परिधान करणं आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिअंट घातक असल्याचा कोणताही पुरावा शास्त्रज्ञांना आढळला नाही.सीएसआयआर अर्थातच विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेने हे संशोधन केले आहे. महाराष्ट्रात केवळ दोन जिल्ह्यातच डेल्टा प्लस व्हेरिअंट आढळला असल्याचे डॉ. मांडे यांनी सांगितले आहे.