CoronaIndiaUpdate : देशातील ८ राज्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण

नवी दिल्ली : देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर येत असतानाच देशात डेल्टा प्लस वेरियंटच्या रुग्णांची संख्या ५० वर पोहोचली असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. देशातील ८ राज्यांमध्ये डेल्टा वेरियंटचे ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगण आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे, असे राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक डॉ. एस. के. सिंह यांनी सांगितले .
गेल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात ५३१ जिल्ह्यांमध्ये रोज १०० हून अधिक रुग्ण आढळून येत होते.तर जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यांची संख्या कमी होऊन ती २६२ जिल्ह्यांपर्यंत खाली आली आहे. सध्या देशात १२५ जिल्ह्यांत १०० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ५१, ६६६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या एक आठवड्यात करोना रुग्णांची संख्या ही कमी झाली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ६, १२, ००० पर्यंत खाली आली आहे.
दरम्यान देशाचा करोना रुग्ण बरे होण्याचा दर हा ९६.७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. दुसरीकडे लसीकरणाचा वेगही वाढला आहे. देशात आतापर्यंत ३१,१३,१८,३५५ जणांना करोनावरील लसीचा डोस देण्यात आला आहे. गेल्या काही तासांत ३४ लाखा अधिक नागरिकांना करोनावरील लसीचा डोस देण्यात आला आहे. तर ४७ लाखांहून अधिक डोस पापइ लाइनमध्ये आहेत. संपूर्ण देशात कोरोनावरील लसीकरणाचा विस्तार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल म्हणाले.