CoronaNewsUpdate : पैशाची पैज लावतो , तिसरी लाट येणार नाही , मात्र काळजी घ्या , सुरक्षित राहा : राकेश झुनझुनवाला

मुंबई : राज्यात सर्वत्र तिसऱ्या लाटेच्या शक्यतेची चर्चा जोरात असताना , गुंतवणूक क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या राकेश झुनझुनवाला यांनी भारतामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार नाही असा दावा केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पुढे म्हटले आहे कि , “मी तुम्हाला पैजेवर पैसे लावून सांगायला तयार आहे की भारतामध्ये इतक्यात (करोनाची) तिसरी लाट येणार नाही.” .
करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे शेअर बाजारामध्ये मंदी येण्याची भीती गुंतवणूकदारांमध्ये आहे. याचसंदर्भात बोलताना गुंतवणुकदारांनी घाबरण्याची आणि तिसऱ्या लाटेमुळे मंदी येईल यासंदर्भात चिंता करण्याची गरज नसल्याचं झुनझुनवाला यांनी सांगितलं आहे. “कोणीही दोन लाटांचं भाकित व्यक्त केलं नव्हतं. मात्र आता सगळेजण तिसऱ्या लाटेची भविष्यवाणी करत आहेत. सध्या ज्या वेगाने लसीकरण सुरु आहे ते पाहता आपल्या सर्वांना हर्ड इम्युनिटी मिळेल. त्यामुळेच तिसरी लाट येण्याची शक्यता मला तरी वाटत नाही,” असे झुनझुनवाला यांनी आपले मत मांडताना म्हटलं आहे.
पुढे बोलताना झुनझुनवाला यांनी तिसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही असं मतही व्यक्त केलं आहे. मात्र काही बदल करण्याची गरजही झुनझुनवाला यांनी बोलून दाखवली. “लाट येवो अथवा न येवो भारतीय अर्थव्यवस्था ही कोणत्याही संकाटाचा सामना करण्यासाठी तयार आहे. तिसरी लाट येणार नाही यासाठी मी पैजेवर पैसे लावण्यासाठीही तयार आहे. सोशल नेटवर्किंगवर सर्वच हुशार लोक तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करत असल्याने आपण घाबरुन गेलो आहोत. आपण सतर्क राहून काळजी घेतली पाहिजे. मात्र मला वाटत नाही की तिसरी लाट येईल,” असेही झुनझुनवाला म्हणाले.