PuneNewsUpdate : थांबा : लोणावळा , खंडाळ्याला पर्यटनासाठी जाण्याचा विचार असेल तर जाऊ नका…

पुणे : सुटीचा आनंद घेण्यासाठी लोणावळा किंवा खंडाळ्याला जाण्याचा विचार करीत असाल तर तूर्त जाऊ नका. पर्यटनस्थळी बंदीचे आदेश धुडकावून वर्षांविहारासाठी लोणावळा, खंडाळा तसेच मावळ तालुक्यात आलेल्या ४२१ जणांविरोधात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी रविवारी कारवाई करून त्यांच्याकडून दोन लाख ६२ हजारांचा दंड वसूल केला. दरम्यान पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून पर्यटकांना माघारी पाठवून त्यांच्यावर हि दंडात्मक कारवाई केली आहे.
याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी सांगितले या पर्यटन स्थळावर येण्यास कोरोनामुळे बंदी असतानाही लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट, भाजे लेणी, कार्ला लेणी, लोहगड किल्ला, पवना धरण परिसरात पर्यटक रविवारी दाखल झाले होते परंतु पोलिसांनी या भागात नाकाबंदी करून रस्ते वाहतुकीस बंद केले आहेत. त्यामुळे पर्यटकांना आल्या वाटेने परत पाठवून त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली, यांनी दिली.
दरम्यान लोणावळा शहर, ग्रामीण भागातील हॉटेल, बंगले, फार्म हाउस या ठिकाणी शासकीय नियमांचे पालन करून खोल्या आरक्षित करण्यास मुभा आहे. मात्र, पर्यटन स्थळे, मंदिरे, धबधबे, धरण परिसरात जाण्यास बंदी आहे. त्यामुळे लोहगड, विसापूर, श्री एकवीरा देवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करण्यात आली आहे.
या दरम्यान सिंहगड किल्ला, खडकवासला धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर हवेली पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली. खडकवासला, गोळेवाडी परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. मास्क न लावणे असे आदेश भंग केल्याप्रकरणी १३२ जणांविरोधात कारवाई करून त्यांच्याकडून ४७ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.