ShivsenaNewsUpdate : आम्हीही देऊ स्वबळाचा नारा… !! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काँग्रेसला इशारा , विरोधकांनाही सुनावले…

महाविकास आघाडीची चिंता दुसऱ्याने करू नये
मुंबई : आम्ही चालू पण स्वाभिमानाने चालू, आम्ही आमच्या पायावर पुढची वाटचाल करू. सत्ता न मिळाल्याने काहींचा जीव कासावीस होत आहे पण महाविकास आघाडीची चिंता दुसऱ्याने करू नये. आम्ही आमच्या रुबाबात चाललो आहोत. आम्ही हपापलेलो नाही.अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत, मग आम्हीही देऊ स्वबळाचा नारा देऊ पण स्वबळाचा नारा हा केवळ निवडणुकीसाठी नसतो, तर तो अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी असतो असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. महाविकास आघाडीचा प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने उद्धव ठाकरे बोलत होते.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्षाचा हा आजचा दुसराच वर्धापन दिन आहे. कोरोनाचे संकट असल्याने मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत समाज माध्यमांद्वारे संवाद साधत आहेत. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचा नारा दिला आहे. त्यावरून मोठी राजकीय चर्चा सुरू आहे या चर्चेत सूर मिसळण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.
या विषयावर उद्धव ठाकरे बोलणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका रोखठोकपणे बोलली. विशेष म्हणजे शिवसेनेच्या ५५व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून उद्धव ठाकरेंनी त्यावर सडेतोड भूमिका मांडत काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. “जे अनेक राजकीय पक्ष करोनमा काळातही स्वबळाचा नारा देत आहेत, त्यांना मला सांगायचंय की स्वबळ हे फक्त निवडणुकांपुरतंच नसतं. न्याय्य हक्क मागण्यासाठी देखील स्वबळ लागतं. नाहीतर अन्याय होत असतानाही बळच नसेल, तर वार कसा करणार?” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान सत्तेसाठी कधीही लाचारी पत्करणार नाही, मात्र त्यासाठी कोणाची तरी पालखी वाहणार नाही. माझ्या घरात मी करोना येऊ देणार नाही, असा संकल्प प्रत्येकाने करायचा आहे. असे झाले तर आपले राज्य करोनामुक्त झाल्याशिवाय राहणार नाही असे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि , केवळ निवडणुका आणि सत्ताप्राप्ती हा विचार बाजूला ठेवून आर्थिक संकटाचा सामना कसा करायचा याचा विचार न करता आपण असेच वागलो तर मग आपल्या देशाचे काही खरे नाही. शिवसैनिक कधीही खचला नाही. रक्तपात नव्हे, तर रक्तदान करणे ही शिवसैनिकाची ओळख आहे. शिवसेना अजूनही एकएक पाऊल टाकत पुढे चालली आहे. आरोप करायचा आणि पळून जायचे हे राजकारणाचे विद्रुपीकरण आहे.
मुख्यमंत्री असेही म्हणाले…
>> सत्तेसाठी देशात राजकारणाचे विद्रुपीकरण करणे सुरू आहे.
>> हिंदुत्व ही काही पेटंट कंपनी नाही, महाविकास आघाडीत गेलो म्हणजे हिंदुत्व सोडले असे होत नाही. हिंदुत्व हे आमच्या हृदयात आहे.
>> प्रादेशिक अस्मिता कशी जपावी याचे उदाहरण बंगालने घालून दिले आहे.
>> विविध प्रकारचे हल्ले पचवून बंगाली माणसाने आपले म्हणणे मांडले, हेच स्वबळ आहे.
>> आपला देश हा संघराज्य आहे. भाषावार प्रांतरचना ही आपल्या देशाची ताकद आहे. त्याची अस्मिता जपलीच पाहिजे. ते धोक्यात आले तर देशावर संकट येईल- मुख्यमंत्री.
>> आम्ही जयहिंद, जय महाराष्ट्र म्हणतो… म्हणजे देश प्रथम आणि प्रादेशिकता नंतर.