MaharashtraNewsUpdate : गाठी-भेटी : राज्याचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी, मराठा आरक्षणावर खा. छत्रपती संभाजी आणि खा. उदयनराजे यांची भेट

पुणे : मराठा आरक्षणावरुन आंदोलनाची हाक दिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी आज पुण्यात उदयनराजेंची भेट घेतली. या भेटीनंतर मराठा आरक्षणाच्या बाबतीत लोकशाहीतील आधुनिक राजांना जाब विचारावा असे आवाहन करताना खा. उदयन राजे यांनी या विषयावरून राज्याचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली तर खा. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारने समाजाच्या पाच मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीचा पत्रकार परिषदेत पुनरुच्चार केला.
पुण्यात दोन्ही राजेंमध्ये मराठा आऱक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाल्यानंतर पत्रकार परिषदेनंतर दोन्ही राजेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून झालेल्या चर्चेची माहिती दिली. संभीजीराजे यांनी यावेळी दोघांमध्ये बहुतांश मुद्द्यावर एकमत झाल्याचे सांगितले. तसेच उदयनराजे यांनी यावेळी उद्या आमच्यावरही हल्ला होईल अशी वेळ येऊ शकते अशी भीती व्यक्त केली. आम्ही दोघे एकाच घराण्यातील आहोत. दोन घराण्यांचा संबंध नाही. संभाजीराजे यांनी मांडलेल्या विचारांशी मी सहमत आहे,” असे उदयनराजे यांनी यावेळी सांगितले . दरम्यान यावेळी त्यांनी देशाची पुन्हा फाळणी करायची की नाही याचा विचारा करावा सांगताना आजचे राज्यकर्ते यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मी राज्याबद्दल बोलत असून केंद्राला पण लागू होतं. प्रत्येक राज्याला लागू होते असेही ते म्हणाले. जीआर काढून मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा
मुद्द्यांवर आधारित राजकारण केले तर लोक पाठिंबा देतील. मुद्दे घेतले जात नाहीत तर समाजाच्या आधारे राजकारण केले जात आहे. कारण नसताना इतकी मोठी दुफळी निर्माण केली आहे. न्यायालयावर तर माझा विश्वासच नाही, असे उदयनराजेंनी यावेळी सांगितले . उदयनराजे यांनी यावेळी संभाजीराजेंनी पुकारलेल्या मूक आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. त्यांनी काय करावं हा त्यांचा मुद्दा आहे, शेवटी मराठा आरक्षण हेच ध्येय आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
“राज्यकर्त्यांना आतापर्यंत फार मुभा दिली आहे. निवडून आल्यानंतर लोकशाहीतील हे जे राजे आहेत त्यांनाही जाब विचारला पाहिजे. राजेशाही होती तेव्हा असं नव्हतं. लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर ते राजे नीट वागत नसले तर त्यांना आडवा आणि गाढलं पाहिजे असं ठाम मत आहे. त्यांना जाब विचारा आणि त्याची सुरुवात माझ्यापासून करा. प्रत्येक आमदार, खासदाराला विचारलं पाहिजे. किती दिवस लोकांना संभ्रमावस्थेत ठेवणार आहात आणि हा अधिकार कोणी दिला,” असा संतापही उदयनराजेंनी व्यक्त केला.
दिशाभूल करणे आमच्या रक्तात नाही – संभाजीराजे
“दोन्ही छत्रपती घराण्यांचा फार मोठा सामाजिक वारसा आहे. समाजाला आम्ही नेहमी एक वेगळी दिशा दिली आहे. दिशाभालू करनये आमच्या रक्तात नाही. म्हणून आपण उदयनराजेंची भेटी घेतली. आमची सविस्तर चर्चा झाली असून बहुतांश अनेक विषयांवर आमचे एकमत आहे. आमच्यात अजिबात दुमत नाही. आम्ही पूर्वीपासून एकमतानं काम करत आलो आहोत,” असे संभाजीराजेंनी यावेळी सांगितले . दरम्यान “मी पाच मागण्या मांडल्या असून मंजूर केल्यास स्वागत करु शकतो. समाज बोलला आहे, लोक बोललेत आणि लोकप्रतिनिधींनी बोलणे गरजेचे आहे. अधिवेशनाच्या माध्यमातूनही हा प्रश्न मार्गी लागू शकतो,” असेही यावेळी त्यांनी सांगितले . बऱ्याच वर्षानंतर सातारा आणि कोल्हापूर घराणं एकत्र झाल्याचा आनंद यावेळी त्यांनी व्यक्त केला. अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज भेटीवर बोलताना ते म्हणाले की, “अजित पवार यांना आशीर्वाद घ्यायचा असेल. त्या भेटीत काय झालं याची माहिती नाही. ही भेट होणार आहे याची मला कल्पना नव्हती. काही सकारात्मक होत असेल तर स्वागतच आहे”.