MumbaiNewsUpdate : मोठी बातमी : अपक्ष खा. नवनीत राणा यांचे जातीचे प्रमाणपत्र खोटे ठरवून न्यायालयाने ठोठावला दोन लाखांचा दंड

मुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना मुंबई उच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल आक्षेप नोंदवत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने खासदार राणा यांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द करून राणा यांना दोन लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे.
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या अमरावती मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. या निवडणूक निकालानंतर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयाने आज निकाल दिला. उच्च न्यायालयाने हा घटनेवरील घोटाळा आहे, असे मत नोंदवून सदर जात प्रमाणपत्र रद्द करुन नवनीत राणा यांना दोन लाखाचा दंड ठोटावला आहे. तसेच त्यांनी आपले खोटे जात प्रमाणपत्र सहा आठवड्याच्या आत शासनाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आनंदराव अडसुळ यांच्या वतीने अॅड. सी. एम. कोरडे, अॅड. प्रमोद पाटील व अॅड. सचिन थोरात यांनी बाजू मांडली.
या प्रकरणात राणा यांनी जात पडताळणी समितीसमोर दाखल केलेली मूळ कागदपत्रे सादर करण्याची मागणी यचिकाकर्त्यांनी केली होती. याचिकाकर्त्यांनी केलेली विनंती उच्च न्यायालयाकडूनही मान्य करण्यात आली होती. मूळ कागदपत्रे पुढील सुनावणीपर्यंत सादर करण्याचा आदेश न्यायालयाने राणा यांना दिला होता. या प्रकरणी आज पुढील सुनावणी झाली. सुनावणीअंती न्यायालयानं राणा याचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल दिला.आहे.