MaharashtraNewsUpdate : ताजी बातमी : पंतप्रधानांशी सकारात्मक चर्चा : मुख्यमंत्री , असे होते चर्चेचे विषय…

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील प्रमुख मुद्यांवर तासभर चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली असून लक्ष घालण्याचे आवाहन मोदींनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत कोणकोणत्या मुद्यांवर चर्चा झाली, याबद्दल सविस्तर माहिती दिली. दरम्यान पंतप्रधान कार्यालयानेही या बैठकीबाबत माहिती दिली आहे.
जवळपास ४५ मिनिटे ही भेटीसाठी निर्धारीत करण्यात आली होती. परंतु, सकाळी ११.०० वाजता सुरू झालेली ही बैठक जवळपास पावणे दोन तास ही बैठक सुरू होती. या दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची वैयक्तिकरित्या भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या संदर्भात पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनीही पंतप्रधानांशी वैयक्तिकरित्या भेट झाल्याचं मान्य केले. आजच्या भेटीदरम्यान, ‘आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींची वैयक्तिकरित्या ३० मिनिटे भेट घेतली. सत्तेत एकत्र नाहीत याचा अर्थ नाते तुटलं असा होत नाही. या भेटीत वावगं काहीच नाही. मी काही नवाझ शरीफ यांच्या भेटीसाठी गेलो नव्हतो’, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. आजची झालेली भेट ही अधिकृत बैठक होती.
Chief Minister of Maharashtra Shri Uddhav Thackeray, Deputy Chief Minister Shri @AjitPawarSpeaks and Cabinet Minister Shri @AshokChavanINC called on PM @narendramodi. @OfficeofUT @CMOMaharashtra pic.twitter.com/aiJRzKRiyl
— PMO India (@PMOIndia) June 8, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी आज (मंगळवारी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र सदनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ही एक अधिकृत बैठक होती. सगळे विषय पंतप्रधानांनी गांभीर्याने ऐकून घेतले, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी या बैठकीबद्दल अधिक माहिती दिली.
महत्वपूर्ण विषयांवर चर्चा
पंतप्रधानांसोबतच्या आजच्या भेटीवर महाआघाडीचे तीनही नेते समाधानी आहेत. आजच्या भेटीमध्ये कुठलाही राजकीय अभिनिवेश नव्हता. शांतपणे आणि समजूतदारपणे वेगवेगळ्या विषयांवर पंतप्रधानांसोबत चर्चा झाली असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले . तसंच १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत लशीची घोषणा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मुख्यमंत्र्यांनी मानले आहेत. गेल्या वर्षभरापासून पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्याचा विचार सुरू होता. अखेर आज त्यांची भेट झाली. राज्यातील महत्त्वाच्या मुद्यांवर पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पंतप्रधानांसोबत चर्चा झाली असून यावर तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ओबीसी आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे इतर मागासवर्गीय राजकारणातील आरक्षणाचा मुद्यावर चर्चा केली आहे. हा देशभरात गावपातळीवर महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यावर निर्णय घेण्याचे आश्वासन मोदींनी दिले.
Maharashtra CM Uddhav Thackeray arrives at Delhi's IGI Airport, ahead of his meeting with PM Modi today
A delegation of state government led by CM Thackeray & Deputy CM Ajit Pawar will meet PM to discuss issues like Maratha reservation, OBC reservation, and cyclone relief pic.twitter.com/mdVn13OTtS
— ANI (@ANI) June 8, 2021
या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने भूमिका घ्यावी , इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण, मागासवर्गियांच्या पद्दोन्नतीतल्या आरक्षणाचा मुद्दा, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेची उपलब्धता, केंद्राकडून मिळणारा जीएसटीचा परतावा वेळेत द्यावा, पीक विमा अटी-शर्थींच्या सुलभीकरणावर, बल्क ड्रग पार्क : स्पर्धात्मक निविदेस मंजुरी, चक्रीवादळानंतर मदतीचे निकष बदलण्याबाबत, १४ व्या वित्त आयोगातील थकित निधी मिळावा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या निवड करण्याबाबत राज्यपालांना सांगावे, नैसर्गिक आपत्तीमधील मदतीसाठी एनडीआरएफचे कॉस्ट नॉर्म (निकष) बदलण्यात यावेत आदी विविध मागण्यांवर चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यपालांची मोदींकडे तक्रार : अजित पवार
दरम्यान मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी यावेळी मोदींसमोर विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांचा मुद्दाही आग्रहाने मांडला. “सरकार बहुमतात आहे. कॅबिनेटने ठरावा केला आणि राज्यपालांना भेटलो. या १२ जागा जवळपास आठ महिन्यापासून रिक्त आहेत. नियमावलीत ज्याप्रमाणे व्यक्ती निवडताना अटी असतात त्या सर्वांचा त्यात समावेस आहे. तर तो मुद्दाही आम्हीही मोदींकडे मांडला. यावर त्यांनी जे काही करण्याची गरज आहे त्यासंबंधी निर्णय घेतो असे सांगितले आहे,” अशी माहिती अजित पवारांनी दिली.
५० टक्क्यांची मर्यादा शिथील करावी : अशोक चव्हाण
अशोक चव्हाण यांनी यावेळी नरेंद्र मोदींसमोर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला असल्याची माहिती दिली. मराठा आरक्षणातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातील महत्वाचे मुद्दे मोदींच्या निदर्शनास आणून दिले असं अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. “आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथील करावी, अन्यथा राज्यांना अधिकार देऊनही आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार नाही,” अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. तसा युक्तिवाद सुप्रीम कोर्टात झाला पाहिजे असं मतही यावेळी त्यांनी व्यक्त केलं.