MaharashtraNewsUpdate : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांची भेट

मराठा आरक्षणावरील तोडग्याची शक्यता
मुंबई : मराठा आरक्षणावरून मराठा समाजाच्या भावना तीव्र असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत प्रामुख्याने मराठा आरक्षणावर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मोदी-ठाकरे यांच्या भेटीकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट मिळावी म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती मान्य केली असून उद्धव ठाकरे यांना उद्या मंगळवारी भेटीची वेळी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी मराठा आरक्षणावर चर्चा करतील. यावेळी आघाडी सरकारमधील काही मंत्रीही त्यांच्यासोबत असतील असेही समजते.
याबाबत प्रसार माध्यान्ही दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यामध्ये उद्या मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. या भेटीत केंद्र सरकारने काय केल्यास मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच घटनादुरुस्ती आणि मागासवर्ग आयोगाच्या अनुषंगानेही या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मोदी-ठाकरे यांची पहिल्यांदाच भेट होत आहे. या भेटीतून मराठा आरक्षणावर मार्ग निघण्याची दाट शक्यता असल्याने त्याकडे संपूर्ण मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, कालच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नी लवकरच पंतप्रधानांची भेट घेण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते. ‘मराठा आरक्षणाला सगळ्या स्तरातून, वेगवेगळ्या संघटनांकडून पाठिंबा मिळालेला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात याबाबत वेगळा निर्णय झाला. परंतु, राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून आता संसदेत याबाबत आवाज उठवण्याची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षण लागू करण्यासाठी आग्रह करणार आहे’, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली होती.