कोरोनाकाळातही देश आत्मनिर्भर; वैज्ञानिक आणि संशोधकांचे मोदींकडून कौतुक

देशातल्या वैज्ञानिक आणि संशोधकांच्या कामगिरीमुळे देश प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. वर्षभरात कोरोना प्रतिबंधक लस तयार करुन देश आत्मनिर्भर झाल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. सीएसआयआर (Council of Scientific and Industrial research)च्या आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी वैज्ञानिक आणि संशोधकांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात दिलेल्या योगदानाविषयी त्यांचे कौतुक केले.
भारताने वर्षभरातच करोना प्रतिबंधक लस तयार केली आणि जगाला दिली. हे वैज्ञानिकांच्या परिश्रमाचे फळ असल्याचेही मोदी म्हणाले.सीएसआयआरने आता समाजाशी संवाद साधून, त्यांच्या सल्ल्यांचा विचार करुन काम करायला सुरुवात केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले,सीएसआयआरबद्दल लोकांना माहिती मिळायला हवी. आपल्या देशातले वैज्ञानिक, संशोधक कशासंदर्भातले काम करत आहेत, हे त्यांना सोप्या भाषेमध्ये कळायला हवे . त्यामुळे तशी माहिती उपलब्ध करुन देण्याचा सल्ला मी देत आहे.
आपला देश आता सगळ्याच क्षेत्रामध्ये पुढे जात आहे. आता आपल्याला योग्य नियोजन करुन आणि निश्चित दिशेने देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोरोनामुळे सध्या आपल्या प्रगतीचा वेग मंदावला असला तरीही आत्मनिर्भर भारत हाच आपला संकल्प आहे. वैज्ञानिकांची कठोर काळातील परिश्रम करुन आत्मनिर्भर होण्याची भूमिका ज्याप्रमाणे आहे, तशीच भूमिका आपल्याला प्रत्येक क्षेत्रात घ्यायची आहे, असेही ते यावेळी म्हणाले.