एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्र्यांना आवरण्याचा सल्ला

राज्यातील लॉक – अनलॉकच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहेत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला चिमटा काढताना मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आवरण्याचा आणि शिस्त लावण्याचा सल्लाही दिला आहे. आता या सल्ल्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय उत्तर देणार असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
सरकारवर टीका करताना फडणवीस म्हणाले कि, राज्यात एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहेत. अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजून घोषणा करताहेत. कोणत्याही सरकारमध्ये पॉलिसी डिसीजन घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. एखाद्यावेळी मुख्यमंत्री अशा घोषणा करण्यासाठी मंत्री नेमतात आणि ते मंत्री सरकारच्या लाईनवर भाष्य करतात. पण या सरकारमध्ये एकाच विषयावर पाच पाच मंत्री घोषणा करत असतात. विशेष म्हणजे प्रत्येक मंत्री घोषणा करून ही घोषणा मुख्यमंत्री करणार असल्याचे सांगत आहेत.
प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. काम करुन तरी ते श्रेय घ्यावे परंतु कालचा गोंधळ जरा जास्तच झाला आहे. या आधीही अनेकदा गोंधळ झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे. बोलण्यावर बंधने आणू नये पण किमान मोठ्या धोरणात्मक निर्णयावर सरकारचे म्हणणे आहे ते स्पष्टपणे आणि थेट जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. राज्य सरकारने आधी अनलॉकची घोषणा केली. त्यानंतर घुमजाव केल्याने आम्हाला अनेकांचे फोन आले. लॉकडाऊन आहे की नाही आम्हाला विचारण्यात आले . मात्र, आमच्याकडेही त्याचे उत्तर नव्हते . लॉकडाऊनमुळे सध्या लोकांमध्ये संभ्रम, उत्कंठा, निराशा आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊननंतर काल लोकांची उत्सुकता वाढली होती. उत्कंठाही वाढली होती. संभ्रमही निर्माण झाला आणि निराशाही झाली. कालच्या घोषणेमुळे अनेक छोटे दुकानदार सुखावले होते, पण नंतर त्यांचा भ्रमनिरास झाला. काल अनलॉकची घोषणा झाल्यानंतर लोकांना वाटले की सुटलो. छोट्या दुकानदारांना निर्बंध संपले असे वाटले . अनेक दुकानदारांचा ७ ते २ या वेळेला विरोध असून सकाळी ९ ते ४ करावी अशी मागणी आहे. त्यामुळे अनेकांची निराशा झाली. सरकारने या बाबतीत लक्ष देण्याची गरज आहे.