सावधान !! आता येते आहे तिसरी लाट…

राज्य आणि देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत असतानाच तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाची तिसरी लाट देखील दुसऱ्या लाटेप्रमाणेच धोकादायक असेल, असा इशारा एसबीआय इकोरॅप रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे. या लाटेचा प्रभाव ९८ दिवस असेल, असा अंदाज देखील या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
एसबीआय इकोरॅपने आंतरराष्ट्रीय अनुभवाच्या आधारावर हा रिपोर्ट तयार केला आहे. ‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव हा दुसऱ्या लाटेसारखा असेल. जगातील प्रमुख देशांमध्ये तिसऱ्या लाटेचा प्रवाह ९८ दिवस होता. तर दुसऱ्या लाटेचा प्रवाह हा १०८ दिवस होता. या लाटेचा सामना करण्यासाठी मोठी तयारी करणे आवश्यक असून या तयारीच्या जोरावर मृत्यूदराचे प्रमाण कमी करणे शक्य आहे,’ असे या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून धडा घेत केंद्र आणि राज्य सरकारने तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमीवर या रिपोर्टमधील निष्कर्ष महत्त्वाचे मानले जात आहेत.या अहवालानुसार , ‘तिसऱ्या लाटेतील गंभीर रुग्णांचे प्रमाण ५ टक्क्यांपर्यंत आणि एकूण मृत्यूचे प्रमाण ४० हजारार्यंत कमी करणे शक्य आहे. दुसऱ्या लाटेत हे प्रमाण २०टक्के होते. यामध्ये आत्तापर्यंत १.७ लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वात जास्त फटका भारताला बसला आहे. मात्र आता याची तीव्रता कमी होत आहे. तिसऱ्या लाटेमध्ये मृत्यूदर कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण आणि उत्तम आरोग्य सुविधा आवश्यक आहेत.’ गेल्या २४ तासात देशात बुधवारी कोरोना व्हायरसचे १,३२,७८८ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे देशात कोरोनाची लागण झालेल्या एकूण व्यक्तींची संख्या २, ८३, ०७, ८३२ झाली आहे. या महामारीत आत्तापर्यंत एकूण ३, ३५, १०२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.