CoronaMaharashtraUpdate : राज्यात २ लाख १६ हजार ०१६ अॅक्टिव्ह रुग्ण , १५ हजार १६९ नवे रुग्ण

मुंबई : गेल्या २४ तासांमध्ये राज्यात १५ हजार १६९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात ५७ लाख ७६ हजार १८४ नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी आजघडीला २ लाख १६ हजार ०१६ अॅक्टिव्ह रुग्ण राज्यात उपचार घेत आहेत तर २८५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत करोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा ९६ हजार ७५१ इतका झाला आहे. मात्र, त्याचवेळी राज्याचा मृत्यूदर १.६७ टक्के इतका झाला आहे. एकीकडे मृतांचा आकडा खाली आल्यामुळे दिलासा मिळालेला असताना दुसरीकडे नव्या कोरोनाबाधितांची संख्या देखील काहीशी स्थिर झाली आहे.
रिकव्हरी रेट वाढून ९४.५४ टक्क्यांवर!
दरम्यान, एकीकडे नवे करोनाबाधित आणि मृतांचे आकडे खाली येत असताना दुसरीकडे राज्यातील बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे आकडे वाढू लागले आहेत. आज दिवसभरात राज्यात एकूण २९ हजार २७० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत राज्यात तब्बल ५४ लाख ६० हजार ५८९ रुग्णांनी करोनावर मात करून सुखरुप घर गाठलं आहे. त्यामुळेच राज्याचा एकूण रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे एकूण बाधित सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत ९४.५४ टक्के इतके झाले आहे.
Maharashtra reports 15,169 new cases, 285 deaths and 29,270 recoveries in the last 24 hours; Recovery rate in the state is 94.54% pic.twitter.com/F3HT2B7Alw
— ANI (@ANI) June 2, 2021
पुण्यात ४६७ नवे रुग्ण, २९ मृत्यूंची नोंद
पुणे शहरात आज दिवसभरात ४६७ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर रुग्णसंख्या ४ लाख ७० हजार ७७८ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान २९ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत पुण्यात मृतांची संख्या ८ हजार ३१३ झाली आहे. त्याच दरम्यान ६५१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत ४ लाख ५७ हजार १६० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळाला. एप्रिल महिन्यात या साथीने राज्यात थैमान घातले होते. दैनंदिन रुग्णसंख्येने ६७ हजारांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर ही लाट हळूहळू ओसरायला लागली आहे. रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहायला मिळाले असले तरी आता दैनंदिन आकडे १५ हजारांपर्यंत खाली आले आहेत. गेल्या दोन आठवड्यात ही लाट खऱ्या अर्थाने उतरणीला लागली आहे. राज्यात काल मंगळवारी करोनाचे १४ हजार १२३ रुग्ण आढळले होते. आज त्यात थोडी वाढ झाली. आज १५ हजार १६९ नवीन रुग्णांची भर पडली. महत्त्वाचे म्हणजे राज्यात गेल्या २४ तासांत २९ हजार २७० रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत.
अशी आहे करोनाची राज्यातील आजची स्थिती
- राज्यात आज २८५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.६७ % एवढा आहे.
- आज राज्यात १५,१६९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज २९,२७० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ५४,६०,५८९ करोनामुक्त.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.५४ % एवढे झाले आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५५,१४,५९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,७६,१८४ (१६.२६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
- सध्या राज्यात १६,८७,६४३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ७,४१८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.