EducationNewsUpdate : सीबीएसई , आयसीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द , आता लक्ष महाराष्ट्राकडे

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाची १२ वीची परीक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला सीबीएसईचे अध्यक्ष उपस्थित होते. याशिवाय या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकरही सहभागी होते.
देशभरातील कोरोनामुळे झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर्षी 12 वीच्या परीक्षा होणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट करून भारत सरकारने बारावीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले. परीक्षांविषयी विस्तृत सल्लामसलत केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षिता आणि त्यांचं भवितव्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, त्यादृष्टीने आम्ही हा निर्णय घेतल्याचे पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
Government of India has decided to cancel the Class XII CBSE Board Exams. After extensive consultations, we have taken a decision that is student-friendly, one that safeguards the health as well as future of our youth. https://t.co/vzl6ahY1O2
— Narendra Modi (@narendramodi) June 1, 2021
आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत बारावीच्या परीक्षेसंदर्भात चर्चा करण्यात आली. कोरोना संकटात परीक्षा कशा घेण्यात येतील, परीक्षा घेतली जाईल की नाही, यावर चर्चा करण्यात आली. शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल आज CBSE बोर्ड परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार होते, परंतु अचानक प्रकृती बिघडल्यामुळं त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते . शिक्षण मंत्रालयाला 03 जूनपर्यंत परीक्षांच्या निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयाला माहिती द्यावी लागणार असल्याने आजची बैठक अतिशय महत्त्वाची होती. केंद्र सरकारने काल 31 मे रोजी परीक्षांविषयी निर्णय घेण्यासाठी दोन दिवस अवधी देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आजही बैठक झाली.
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही काल पंतप्रधान मोदींना पत्र लिहून बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सतत परीक्षा रद्द करण्याची मागणी करीत आहेत, त्यामुळे सरकारने त्यांच्या बोलण्याकडंही लक्ष दिलं पाहिजे. या साथीच्या काळात ऑफलाइन परीक्षांच्या माध्यमातून मुलांना संसर्ग होण्याचा धोका आहे.
आयएससीई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षाही रद्द
दरम्यान आयएससीई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांना गुण देण्याच्या संदर्भात कशा प्रकारे मूल्यांकन करण्यात येणार याचे निकष लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे बोर्डाने सांगितले आहे.
Indian School Certificate (ISC) Board examinations (Class 12) have been cancelled. The final decision on compiling results is yet to be taken: Dr G Immanuel, Chairman, Council for the Indian School Certificate Examinations (CISCE) to ANI pic.twitter.com/1NACHGP9IR
— ANI (@ANI) June 1, 2021
आता CBSE प्रमाणे राज्यात HSC ची परीक्षाही होणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच परीक्षांचा निर्णय केंद्र पातळीवर एकच काय तो व्हावा, असे आवाहन केले होते. आता केंद्राने त्यांचा निर्णय दिला आहे. राज्यातही तोच निर्णय घेतला जातो का हे लवकरच स्पष्ट होईल. महाराष्ट्र बोर्डाने यंदा दहावीची परीक्षा होणार नसल्याचे आधीच जाहीर केले आहे. आता बारावीची परीक्षाही रद्द होण्याची शक्यता वर्तविली आहे .