ExamNewsUpdate : सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेची सुनावणी गुरुवारपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणी आज झाली. परंतु केंद्र सरकारने यावर उत्तर देण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितल्याने आज पुन्हा एकदा याचिकेवरील सुनावणी स्थगित करण्यात आली. यावेळी अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी केंद्र सरकार दोन दिवसांमध्ये अंतिम निर्णय घेईल असे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे ही विनंती मान्य करत याचिकेवरील सुनावणी गुरुवारपर्यंत पुढे ढकलली आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई, आयसीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका अॅेड. ममता शर्मा यांनी केली होती. न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठासमोर आता गुरुवारी सुनावणी होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या, तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा रद्द करणे शक्य नसल्यामुळे त्या कोणत्या पद्धतीने घ्याव्यात याबाबत विविध पर्यायांचा विचार केला जात आहे. मात्र, परीक्षा लांबल्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकार नेमका कोणता निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आज झालेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने म्हटले की, तुम्हा जो काही निर्णय घ्यायचा असेल तो घ्या.” तर याचिकाकर्त्यांनी म्हटले की, “मागील वर्षात अवलंबलेले धोरण यंदाही अवलंबता येऊ शकते .” “जर सरकार मागील वर्षाच्या आपल्या निर्णयापासून मागे हटत असेल तर त्यांनी ठोस कारण सांगावे ,” असे सुप्रीम कोर्टाने म्हटले . सरकारच्या निर्णयानंतर आम्ही याचा तपास करु, असेही सुप्रीम कोर्टाने नमूद केले.