InformationUpdate : आता गर्दीची चिंता नाही , गुळण्या करा आणि कोरोना आहे कि नाही जाणून घ्या …!!

नवी दिल्ली : कोरोनावरील उपचारासाठी म्हणा वा कोरोना झाला आहे कि नाही हे तपासण्यासाठी आधी केवळ आरटी-पीसीआर पद्धतीचा अवलंब केला जात होता. प्रारंभी राज्यातील काही ठिकाणीच हि सोय होती परंतु कोरोनाचा वाढत प्रभाव लक्षात घेता राज्य सरकारने अनेक जिल्ह्यात कोरोना चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळा उघडल्या. दरम्यानच्या काळात आरटी-पीसीआर चाचण्यांबरोबर अँटीजेन चाचण्या आल्या. यामुळे तत्काळ चाचण्या होण्यास मदत झाली. आता मात्र आणखी एक नवी पद्धत शोधून काढण्यात आली आहे. यामध्ये केवळ गुळण्यांमधून कोरोनाचा तपस लागणार आहे.
या नव्या ‘सलाईन गार्गल आरटी-पीसीआर’ पद्धतीला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) परवानगीही देण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे, नागरिकांना केवळ तीन तासांत या करोना चाचणीचा अहवाल हातात मिळू शकणार आहे. विशेष म्हणजे चाचणीची ही नवी पद्धत पायाभूत सुविधा कमी असणाऱ्या ग्रामीण भागांत तसेच पोहचण्यासाठी अतिशय दुर्गम भागांना अधिक फायदेशीर ठरू शकेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
प्रशिक्षणाची व्यवस्था
दरम्यान वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) अंतर्गत नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) च्या शास्त्रज्ञांनी चाचणीच्या या पद्धतीसहीत एका नवा टप्पा गाठला असून ICMR कडून NEERI च्या आपल्या टीमला देशभरातील लॅबमध्ये या नव्या पद्धतीची ट्रेनिंग देण्यासाठी पाठवण्यात येणार आहे.
अशी केली जाते ही चाचणी ?
याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार सलाइन गार्गल आरटी-पीसीआर या पद्धतीच्या चाचणीत, रुग्णांना खारट पाण्याची गुळणी करून ती एका सामान्य ‘कलेक्शन ट्यूब’मध्ये जमा केली जाते. हा नमुना लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवला जातो. एका विशिष्ट तापमानात, NEERI कडून तयार करण्यात आलेल्या एका विशिष्ट सोल्युशनमध्ये हा नमुना ठेवला जातो. हे सोल्युशन गरम केल्यानंतर एका ‘RNA’ टेम्प्लेट तयार होतं. त्यानंतर या सोल्युशनवर ‘आरटी-पीसीआर’ प्रक्रिया केली जाते.
आता गर्दीत उभे राहण्याची गरज नाही
चाचणीच्या या नव्या पद्धतीत नमुने गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणं खूप स्वस्त पडते , असे ‘नीरी’चे पर्यावरण विषाणू कक्षाचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. कृष्णा खैरनार यांनी म्हटले आहे. लोक स्वतःहून कोरोना संसर्गाची चाचणी करू शकतील कारण ही प्रक्रिया ‘सेल्फ सॅम्पलिंग’ला परवानगी देते. यासाठी चाचणीसाठी नमुने देताना नागरिकांना चाचणी केंद्रांवर वाट पाहण्याची किंवा गर्दीत उभे राहण्याची गरज लागणार नाही. यामुळे बराचसा वेळही वाचतो. या पद्धतीत कमीत कमी कचरा निर्माण होतो. तसेच संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी ही पद्धत फायदेशीर ठरेल, असंही डॉ. खैरनार यांनी म्हटले आहे.