IndiaNewsUpdate : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान ऑक्सिजन सपोर्टवर

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर लखनऊच्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लखनऊच्या मेदांता रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये आझम खान यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. आझम खान यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.
सीतापूर तुरुंगात आझम खान आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम हे दोघंही १ मे रोजी कोरोना संक्रमित आढळले होते. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना ९ मे रोजी तुरुंगातून मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते. आझम खान यांना आयसीयूमध्ये ३ ते ५ लीटर ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या फुफ्फुसात फायब्रोसिस आणि कॅव्हिटी आढळली. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष देत आहे.
कोरोना बाधित आढळलेल्या आझम खान यांची प्रकृती बरी झाल्यानंतर त्यांना आयसीयूतून बाहेर जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. परंतु, त्यांची प्रकृती ढासळल्यानंतर त्यांना २६ मे रोजी पुन्हा एकदा आयसीयूमध्ये हलवण्यात आले .तर, आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांची करोना चाचणी आता निगेटिव्ह आलीय. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. परंतु, अद्यापही त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला नाही. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, कोरोना संक्रमित आढळलेलेल आझम खान आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला सीतापूर तुरुंगात बंद होते. प्रकृती बिघडल्यानंतर तुरुंग प्रशासनाने त्यांना ९ मे रोजी लखनऊच्या मेदांता रुग्णालयात दाखल केले होते . आझम खान यांच्यासोबत आणखी १३ बंदीही कोरोना संक्रमित आढळले होते.आझम खान गेल्या १४ महिन्यांपासून (फेब्रुवारी २०२०) पासून सीतापूर तुरुंगात बंद आहेत. त्यांच्यावर रामपूरमध्ये अवैधरित्या जमिनीवर ताबा मिळवण्याचा तसंच खोटे प्रमाणपत्र बनवण्यासारखे अनेक गुन्हे दाखल झालेत. त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांच्यावरही खोट्या प्रमाणपत्राचे गुन्हे दाखल आहेत.