MaharashtraNewsUpdate : मराठा आरक्षणाच्या टिकेवरून अशोक चव्हाण यांनी भाजपला फटकारले

मुंबई : मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर या मुद्द्यावरून भाजपकडून महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे. तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे भाजपच्या टार्गेटवर आहेत. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आक्रमक झालेल्या अशोक चव्हाण यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
मराठा आरक्षण टिकावे म्हणून महाविकास आघाडीने प्रयत्न सोडलेले नाहीत आणि ज्यांच्या काळात कायदा आला ती भाजप मात्र प्रयत्न सोडून मोर्चांचे इशारे देत आहे. दोघांमधील फरक स्पष्ट आहे आणि हेतूही स्पष्ट आहे,’ अशी टीका अशोक चव्हाण यांनी भाजपवर केली आहे. हातात हात घालून काम केले तर अजूनही वेळ गेलेली नाही. बघू कोण किती प्रामाणिक आहे ते? असे आव्हानही अशोक चव्हाण यांनी भाजपला दिले आहे.
अशोक चव्हाण यांनी काल गुरुवारीही भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला होता. ‘भाजपने मराठा आरक्षणाबाबत समाजाची दिशाभूल करू नये, असे आवाहन आम्ही वारंवार करीत आहोत पण दिशाभूल हाच त्यांचा एकमेव अजेंडा दिसतो आहे. आ. चंद्रकांत पाटील म्हणतात, फेरविचार याचिकेसाठी ४ जून पर्यंतची मुदत आहे. पण ही वस्तुस्थिती नाही. भाजप व आ. चंद्रकांत पाटील यांना माझे पुनःश्च आवाहन आहे की, कृपया मराठा समाजात गैरसमज निर्माण करण्याचे उद्योग त्यांनी बंद करावेत,’ अशा शब्दांत चव्हाण यांनी भाजपला फटकारले. तसेच माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या समितीचा अहवाल ३१ मे पर्यंत अपेक्षित असून, त्यानंतर राज्य सरकार पुढील निर्णय घेईल, अशी माहितीही अशोक चव्हाण यांनी दिली.