InformationUpdate : लस घ्यायला घाबरताय ? तर तुमच्यासाठी हि आनंदाची बातमी आहे !!

नवी दिल्ली : सध्या जगात सर्वत्र लसीकरण चालू असले तरी कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आणखी लसी शोधण्याचे संशोधन चालू आहे. दंडातून देण्यात येणाऱ्या लसीकरणाला घाबरणारांसाठी हि बातमी दिलासादायक आहे कि , नाकातून देता येणाऱ्या लशींबद्दलही वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन सुरू आहे. कॅनडाच्या सॅनोटाइझ या कंपनीने अशी नाकातून देता येण्याजोगी लस विकसित केली असून ही लस शरीरातल्या 99.99 टक्के कोरोना विषाणूंना मारून टाकण्याएवढी प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
नेझल स्प्रे स्वरूपातल्या या लशीच्या क्लिनिकल ट्रायल्स अमेरिका, कॅनडा, इस्रायल आणि न्यूझीलंडमध्ये यशस्वी झाल्याचं ‘सॅनोटाइझ’च्या संस्थापक गिली गेलवे यांनी सांगितले आहे. भारतातही हा स्प्रे दाखल करण्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या नेझल स्प्रेमधल्या नायट्रिक ऑक्साइडमुळे नाकातून होणारा विषाणूंचा प्रवेश तर रोखला जातोच; पण जे विषाणू शरीरात आधीच गेले आहेत, त्यांना पेशीमध्ये प्रवेश करणेही नायट्रिक ऑक्साइडमुळे शक्य होत नाही. दोन्ही बाजूंनी विषाणूचा मार्ग रोखला गेल्यामुळे या स्प्रेमुळे 72 तासांमध्ये 99.99 टक्के विषाणू नष्ट होतात, असं कंपनीकडून सांगण्यात आलं.
हा स्प्रे श्वासनलिका विषाणूमुक्त करण्याचे काम करतो.
गिली गेलवे यांनी एका माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, हा नेझल स्प्रे नायट्रिक ऑक्साइडपासून बनवण्यात आलेला आहे. हे रासायनिक द्रव्य मानवी शरीरात आधीपासूनच अस्तित्वात असते त्यामुळे या स्प्रेचे साइड इफेक्ट्स होत नाहीत, असा दावा त्यांनी केला. शरीरात कोणत्याही प्रकारचे विषाणू किंवा जिवाणू तयार होणे , त्यांची वाढ होणे याला नायट्रिक ऑक्साइड प्रतिबंध करते . शरीरात या रसायनाचे अस्तित्व असल्यामुळे शरीराची प्रतिकार यंत्रणा त्याला प्रतिकार न करता स्वीकार करते. शिवाय विषाणू मुख्यतः नाकातूनच शरीरात प्रवेश करत असल्यामुळे हा नेझल स्प्रे या विषाणूंचा मार्गच रोखण्याचे काम करतो. हा अडथळा ओलांडून पलीकडे जाणे कोरोना विषाणूला कठीण होऊन बसते. हा स्प्रे नाकापासून फुप्फुसांपर्यंतची श्वासनलिका विषाणूमुक्त करण्याचे काम करतो.
कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून जे लोक याचा वापर करत असतील, त्यांनी तो दिवसातून एक-दोनदा वापरला तरी चालेल. हा स्प्रे संसर्ग होण्याच्या आधी, संसर्ग झाल्यावर आणि त्यातून बरं झाल्यानंतरही वापरणं शक्य आहे, असं गेलवे यांनी स्पष्ट केले. या स्प्रेची किंमत अद्याप ठरवलेली नसली, तरी प्रत्येक नागरिकाला सहज खरेदी करणे शक्य होईल, एवढीच त्याची किंमत ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही गिली गेलवे यांनी सांगितलं.
दरम्यान भारतातही हैदराबादमधली भारत बायोटेक कंपनी कोरोफ्लू नावाचा नेझल ड्रॉप विकसित करत आहे. कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या नाकात याचा एक थेंब घातला जाणार असून, हा ड्रॉप पूर्णतः सुरक्षित असल्याचा दावा कंपनीने केला आहे.