IndiaNewsUpdate : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार : राहुल गांधी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी देशातील कोरोना संसर्गाच्या देशातील स्थितीसंबंधी आज (शुक्रवारी) ऑनलाईन एक पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधींनी कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या लाटेला ओळखूच शकले नाहीत, अशी टीका केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला पंतप्रधान नरेंद्र मोदीच सर्वस्वी जबाबदार असून पंतप्रधानांनी नाटकीपणा केला तसेच आपली जबाबदारी निभावण्यात ते अपयशी ठरले. त्याचाच परिणाम म्हणून कोरोना संसर्गाची दुसरी लाट असल्याचा हल्ला राहुल गांधींनी चढवताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘इव्हेंट मॅनेजर’ म्हणून उल्लेख केला. राहुल पुढे म्हणाले कि , देशात आतापर्यंत केवळ ३ टक्के नागरिकांना लस मिळाली आहे. याच पद्धतीने आणि गतीने लसीकरण मोहीम सुरू राहिली तर देशातील संपूर्ण जनतेच्या लसीकरणासाठी २०२४ पर्यंत वाट पाहावी लागेल.
दरम्यान सरकार आणि पंतप्रधान मोदी अजूनही कोरोनाला समजू शकलेले नाहीत. कोरोना केवळ एक आजार नाही तर तो बदलत जाणारा आजार आहे. तुम्ही जितका वेळ आणि जागा देणार तितकाच तो आणखीन धोकादायक होत जाईल, असा धोक्याचा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.
प्रामुख्याने लसीकरणाच्या गतीवर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले कि, याच गतीने लसीकरण सुरू राहिले तर करोना संसर्गाची तिसरी, चौथी आणि पाचवीही लाटही पाहायला मिळू शकेल.
देशातला मृत्यू दर खोटा असून सरकारकडून चुकीची माहिती दिली जात आहे. विरोधी पक्ष हा काही सरकारचा शत्रू नाही, सरकारला केवळ मार्ग दाखवण्याचे काम विरोधी पक्षाकडून केले जात असून विरोधी पक्ष सरकारचा शत्रू नसल्याचेही राहुल गांधी म्हणाले.