IndiaNewsUpdate : कोरोनापासून बचाव करण्यासाठी बांधले कोरोना मातेचे मंदिर !!

कोईम्बतूर : तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यामध्येही कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी लोकांनी शहराच्या बाहेर चक्क कोरोना देवीचे मंदिर उभारले आहे. विशेष म्हणजे कोरोनापासून मुक्ती मिळावी म्हणून या ठिकाणी ४८ दिवसांच्या महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना देवीचे मंदिर हे प्लेग मरियम्मन मंदिर स्थापन करताना जो विचार करण्यात आला होता त्याच विचाराने उभारण्यात आले आहे. दिडशे वर्षांपूर्वी प्लेगच्या साथीच्या वेळेस प्लेग मरियम्मन मंदिराची स्थापना करण्यात आली होती.
भारतात कोणतेही संकट आले कि , लोक काय करतील याचा नेम नाही. लोकांचे सोडा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी गोरखपूर दौऱ्यादरम्यान योगी आदित्यनाथ यांनी कोरोना संकटापासून दिलासा मिळावा यासाठी रुद्राभिषेकही केला. योगींनी गोरखनाथ मंदिरामध्ये करोनाची साथ आणि लोककल्याणाच्या संकल्पासाठी एक तास रुद्राभिषेक केला. ज्या पंडितांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांनी रुद्राभिषेक केला त्या पंडितांनी दिलेल्या माहितीनुसार या रुद्राभिषेकामुळे करोनाचं संकट दूर होणार असल्याचे सांगण्यात आले होते.
#Corona Devi 🤷🏼♀️ pic.twitter.com/ng6cvNJooJ
— Supriya Bhardwaj (@Supriya23bh) May 20, 2021
शहराच्या बाहेरील इरुगुरमधील कामत्विपुरी अधीनम नावाच्या मठाने या मंदिराची स्थापना केली आहे . या मंदिरात कोरोना देवीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. अधीनमच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवीची मूर्ती काळ्या खडकामधून साकारण्यात आली आहे. ही मूर्ती अडीच फूट उंचीची असून मठाच्या परिसरामधील मंदिरामध्येच तिची प्रतिष्ठापना कऱण्यात आली आहे. रोज येथे अनेक भक्त या कोरोना देवीची पुजा करण्यासाठी येतात.
सध्या उभारण्यात आलेल्या कोरोना देवीच्या मंदिरामध्ये करोनामुळे केवळ पुजारी आणि मठातील अधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात येतो. या देवीच्या मंदिरामध्ये मर्यादित लोकांना जाण्यास परवानगी असली तरी येथे सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते . अशाप्रकारे यापूर्वीही येथे प्लेगच्या साथीच्या वेळेस मंदिराची स्थापना करुन त्याला प्लेग मरियम्मन मंदिर असे नाव देण्यात आले होते . प्लेगमुळे मरण पावणाऱ्यांची संख्या वाढल्यानंतर दीडशे वर्षांपूर्वी हे मंदिर उभारण्यात आले आणि त्यात मरियम्मनची प्रतिमा ठेवण्यात आली होती. लोकांनी या देवाची आराधना सुरु केली आणि त्यानंतर काही कालावधीनंतर प्लेगच्या साथीचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे येथील स्थानिकांनी त्यांच्या पूर्वजांकडून ऐकल्याचे सांगितले जाते.