CoronaNewsUpdate : लसीकरण तुटवड्याबाबत सिरमची केंद्राच्या धोरणावर टीका

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरणाच्या मोहिमेने वेग घेतलेला असतानाच देशात १ मी पासून १८ वर्षावरील सर्वांनाच लस देण्याची घोषणा केल्याने लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे . यामुळे 45वर्षावरील व्यक्तींनाही लसीकरणासाठी वाट पाहावी लागत आहे. या लस टंचाईच्या पार्श्वभूमीवर, पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करताना म्हटले आहे , की केंद्र सरकारने लसीच्या साठ्याबाबत कोणतीही माहिती न घेता आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाइन्सवर विचार न करताच 18 वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी दिली.
वास्तविक पाहता देशाने जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलेल्या गोष्टींचं आणि नियमांचे पालन करायला हवे आणि त्यानुसार लसीकरणाबाबत निर्णय घ्यायला हवा. सुरेश जाधव यांनी पुढे म्हटले आहे , की आपण यातून मोठा धडा घेतला आहे. आपण एखाद्या वस्तूची उपलब्धता पाहूनच त्याच्या वापराबाबत योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे. ते म्हणाले, की लसीकरण गरजेचे आहे. मात्र, लसीकरणानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे, लोकांनी सावध राहायला हवे आणि कोरोनापासून बचावासाठी सर्व नियमांचं पालन करायला हवे.
देशात आतापर्यंत 19.32 कोटीहून अधिक कोरोना लसीचे डोस दिले गेले आहेत. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी याबाबतची माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले , की शुक्रवारी लसीकरण मोहिमेच्या 126 व्या दिवशी लसीचे 13,83,358 डोस देण्यात आले आहेत. तर शुक्रवारी 18-44 वयोगटातील 6,63,353 जणांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला गेला. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात आतापर्यंत सर्व राज्यांमध्ये मिळून या वयोगटातील 92,73,550 लाभार्थ्यांना लस दिली गेली आहे.