CoronaIndiaUpdate : पद्मश्री डॉ. केके अग्रवाल यांच्यासह कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २४४ डॉक्टरांचा मृत्यू

नवी दिल्ली : इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि हार्ट केअर फाऊंडेशनचे प्रमुख पद्मश्री डॉ. केके अग्रवाल (वय 62) यांचे सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास करोना संसर्गामुळे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले होते. तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरच्या आधारावर ठेवण्यात आले होते. दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, करोनाच्या दुसऱ्या लाटेत २४४ डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. रविवारी ५० डॉक्टरांच्या मृत्यूची नोंद झाली. सर्वाधिक मृत्यू बिहार (६९), उत्तर प्रदेश (३४) आणि दिल्लीत (२७) झाले आहेत. यापैकी फक्त तीन टक्के डॉक्टरांचं लसीकरण झाले होते .
इंडियन मेडिकल असोसिएशन करोनामुळे एक हजार डॉक्टरांचा मृत्यू झाले असल्याचे सांगत असताना ही संख्या अजून जास्त असण्याची शक्यता आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन फक्त त्यांच्या साडे तीन लाख सदस्यांचा रेकॉर्ड ठेवतं. पण भारतात १२ लाखांहून अधिक डॉक्टर आहेत.
दोन महिन्यांपूर्वी डॉ. केके अग्रवाल यांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. परंतु गेल्या महिन्यात त्यांना संसर्ग झाला होता. अग्रवाल यांना करोना संसर्ग झाल्यानंतर एम्सच्या आयसीयूमध्ये दाखल केले होते. केके अग्रवाल यांनी 28 एप्रिल रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवर माहिती दिली होती की त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. डॉ.के.के.अग्रवाल हे त्यांच्या व्यवसायामुळे प्रसिद्ध होते. प्रत्येकाने करोना कालावधीत त्यांचा चांगुलपणा पाहिला. संकटाच्या वेळी त्यांनी हजारो लोकांना मदत केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रूग्णांवर त्यांनी विनामूल्य उपचार केले. करोना संकटाच्यावेळी ते नेहमी वॉरियर्स म्हणून उभे राहिले, पण दुर्दैवाने त्याच करोनाबरोबर ते आयुष्याची लढाई हारले. २०१० साली अग्रवाल यांना पद्मश्री पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते.
दोन तरुण डॉक्टरांचा मृत्यू
कोरोना रुग्णांसाठी काम करणाऱ्या दिल्लीमधील गुरु तेग बहादूर रुग्णालयातील २६ वर्षीय डॉक्टर अनस मुजाहिदला करोनामुळेच आपला जीव गमवावा लागला. करोनाची लागण झाल्यानंतर काही तासांतच त्याचं निधन झालं. करोनाच्या दुसऱ्या लाटेत जीव गमावणाऱ्या २४४ डॉक्टरांमधील अनस सर्वात तरुण डॉक्टर आहे. पहिल्या लाटेत गेल्यावर्षी ७३६ डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत देशभरात करोनामुळे जवळपास एक हजार डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला आहे.
अनसच्या मृत्यूनंतर त्याचा मित्र आणि सहकारी डॉक्टर आमीर सोहेलला मोठा धक्का बसला आहे. अनसला घसा दुखणे अशी काही मध्यम लक्षणं जाणवत होती. रुग्णालयात चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. काही वेळातच अनस खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचे लसीकरण झाले नव्हते . “हा आमच्यासाठी खूप मोठा धक्का आहे. त्याला कोणतीही व्याधी नव्हती. तसे आरोग्यासंबंधित कोणतीही समस्या नसल्याचं त्याच्या कुटुंबाने सांगितलं आहे. त्याच्या मृत्यूने आम्हाला धक्का बसला असून हे कसे झाले हेच समजत नाहीये,” असे डॉक्टर आमीर सोहेलने म्हटले आहे.
दरम्यान देशात लसीकरण मोहीम सुरु झाल्यानंतर आतापर्यंत ६६ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. डॉक्टरांनी लस घ्यावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने सांगितले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर जयेश लेले यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, “रविवारी ५० डॉक्टरांचा मृत्यू आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २४४ डॉक्टरांनी जीव गमावणे आमच्यासाठी खूप दुर्दैवी आहे. डॉक्टरांची संख्या कमी असून त्यांच्यावर प्रचंड ताण आहे. कधी कधी तर विश्रांती न घेता ते सलग ४८ तास काम करतात. यामुळे त्यांच्या त्रासात भर पडत असून लागण झाल्यानंतर मृत्यू होत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी सरकारने उपाययोजना करणं गरजेचे आहे,” असे ही त्यांनी सांगितले .