MaharashtraNewsUpdate : व्हॉट्सअॅपवर ठेवलेल्या स्टेटसच्या वादातून खून

पुणे : व्हॉट्सअॅपवर ठेवलेल्या स्टेटसच्या वादातून एका सराईत गुन्हेगाराचा खून झाला आहे. सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून त्याचा खून करण्यात आला. हनुमंत वाघाटे असे मृत गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्या खून प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. वाघाटे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होते. विशेष म्हणजे त्याच्यावर तडीपारी आणि नंतर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली होती.
या प्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, सुनील खाटपे आणि सारंग गवळी यांच्यात रात्री दहा वाजेच्या सुमारास भांडण झाले होते . त्या भांडणाचे कारण अगदी क्षुल्लक होते. सारंग गवळी याने त्याच्या मोबाईलवर कामठे नावाच्या एका तरुणाचे व्हॉट्सअप स्टेटस ठेवले होते . पण सुनील खाटपे याचे त्याच्याशी शत्रुत्व असल्याने त्याने सारंग गवळी याला ते व्हॉट्सअप स्टेटस डिलिट करण्यास सांगितले . गवळी याने नकार दिल्यानंतर यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. काही वेळाने गवळी तिथून निघून गेला.
दरम्यान रागात असलेल्या सुनील खाटपे याने मृत हनुमंत वाघाटेला फोनवर या सर्व प्रकाराची माहिती दिली. वाघाटे याने खाटपेला आपण गवळीला धडा शिकवू असे म्हटले . त्यानंतर हनुमंत वाघाटे सुनील खाटपेच्या घरी त्याला भेटायला आला. पण त्याचवेळी सारंग गवळी याच्या टोळीतल्या सदस्यांनी वाघाटेवर हल्ला केला. त्याला बांबू आणि काठ्यांनी मारहाण केली आणि नंतर रस्त्यावर पडलेला सिमेंटचा ब्लॉक त्याच्या डोक्यात घालून वाघाटेचा खून केला. या प्रकारानंतर काही वेळातच बिबवेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. इतर चौकशी सुरू असून या प्रकरणात आणखी काही कारणं आहेत का, याचा शोध पोलिस घेत आहेत.